रेल्वेचं पाच कोटी रुपयांचं इंजिन गायब झालं, काय आहे नेमकं प्रकरण
दोन महिन्यांपूर्वी एक रेल्वे इंजिन ट्रेलरवर लोड करुन मुंबईकडे रवाना करण्यात आले होते. परंतू ते अद्याप मुंबईत दाखल झालेले नाही.
मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईसाठी हरीयाणा येथून निघालेले रेल्वेचे इंजिन दोन महिने झाले तरी त्याच्या अद्याप डीलिव्हरी न झाल्याने मध्य रेल्वेचे अधिकारी चिंतेत सापडले आहे. या प्रकरणात रेल्वेच्या एका ट्रान्सपोर्टरने वडाळा टी.टी. पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. ज्या इंजिनाची मुंबई डीलिव्हरी होणार होती. त्याची किंमत सुमारे पाच कोटी रुपये असल्याने खळबळ उडाली आहे.
वडाळा टीटी पोलीसांनी दिलेल्या माहीतीनूसार दोन महिन्यांपूर्वी एक रेल्वे इंजिन ट्रेलरवर लोड करुन मुंबईकडे रवाना करण्यात आले होते. परंतू ते अद्याप मुंबईत दाखल झालेले नाही. या नंतर याप्रकरणात रेल्वेच्या वाहतूकदाराने रितसर या प्रकरणाची तक्रार केली आहे. मध्य रेल्वेच्या ट्रान्सपोर्टर अनिल कुमार गुप्ता यांनी पवन शर्मा नावाच्या एका ट्रान्सपोर्टरवर एक रेल्वे इंजिन कालका येथे डीलिव्हरी करण्याची जबाबदारी सोपविली होती. नंतर पवन शर्मा कालकाहून आणखी एक इंजिन मुंबईत पाठविणार होते. या कामासाठी दोघांमध्ये 4, 25,000 रुपयांचे कंत्राट निश्चित झाले, अनिल गुप्ता यांनी यापैकी चार लाख रुपयांचे देणे देखील दिले होते.
पवन शर्मा याच्या कंपनीने २ मे रोजी ट्रेलरवर इंजिन लोड केले, परंतू पैसे मिळण्यास उशीर झाल्याने या इंजिनाची डीलीव्हरी मुंबईच्या पार्सल यार्डमध्ये केली नाही. पवन शर्मा याने पोलिसांना सांगितले की त्याला पैसे वेळेत न मिळाल्याने राजस्थानच्या पेट्रोल पंपावर हा इंजिनाचा ट्रेलर उभा आहे. अनिल गुप्ता यांच्या तक्रारीवरुन आयपीसी कलम 406 आणि 420 नूसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास वडाळा टीटी पोलीस करीत आहेत.