अस्पृश्यतेचा बळी! मटक्यातील पाणी प्यायल्याने तिसरीत शिकणाऱ्या दलित विद्यार्थ्याला मारहाण, कानाची नस फुटून विद्यार्थी ठार
या संतापजनक घटनेप्रकरणी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश यंत्रणांना दिले आहेत. तसंच दोषींवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल, असं म्हणत पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आश्वस्त केलंय.
राजस्थानमध्ये (Rajasthan News) एक संतापजनक घटना घडनी. एका 9 वर्षांच्या विद्यार्थ्याचा शिक्षकाच्या मारहाणीमध्ये मृत्यू (Dalit Student Died) झाला आहे. या घटनेमुळे राजस्थानसह संपूर्ण देशात खळबळ माजली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस अगोदर समोर आलेल्या या घटनेमुळे 75 वर्षांच्या स्वातंत्र्यानंतरही भारतात अस्पृश्यतेचा सामना काहींना करावा लागत असल्याची धक्कादायक बाब अधोरेखित झाली आहे. जातिभेद आणि अस्पृश्यतेचा ठपका ठेवत शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली. या मारहाणीमध्ये विद्यार्थी जबर जखमी झाला. या विद्यार्थ्याच्या कानाची नस फुटल्यानं त्याचा जीव गेला आहे. उपचारादरम्यान, या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. राजस्थानच्या जालोर इथं घडलेल्या या घटनेनं तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या घटनेप्रकरणी आता पोलिसांनी (Rajasthan crime News) गुन्हा दाखल करुन घेत अटकेची कारवाई देखील केली आहे. तसंच राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून चौकशीचे निर्देश दिलेत. शिवाय मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचा निधीदेखील मुख्यमंत्री मदत निधीतून देण्याची घोषणा करण्यात आलीय.
20 जुलैला मारहाण
राजस्थानच्या जालोर जिल्ह्यातील सायला क्षेत्रातील सुराणा गावात ही घटना घडनी. एक 9 नऊ वर्षांचा मुलगा मटक्यातील पाणी प्यायला म्हणून शाळेच्या शिक्षकानं त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत विद्यार्थी जबर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर त्याला उदयपूरला पुढील उपचारासाठी नेण्यात आलं. पण तिथून पुन्हा पुढील उपचारासाठी अहमदाबाद इथं या विद्यार्थ्याला पाठवण्यात आलं होतं. पण शनिवारी या विद्यार्थ्याचा उपचादारम्यान मृत्यू झाला. शनिवारी चार वाजण्याच्या सुमारास या विद्यार्थ्यानं अखेरचा श्वास घेतला. 20 जुलै रोजी शाळेतील शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली होती. मृत्यू झालेली विद्यार्थी दलित असल्याची माहिती समोर आली आहे.
गुन्हा आणि अटक
विद्यार्थ्याला मारहाण केल्याप्रकरणी एससी आणि एसटी कायद्याखाली गुन्हा दाखल करत शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्यार्थ्याचा मारहाणीत मृत्यू झाल्यानंतर आरोपी शिक्षकाविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आलाय. या संतापजनक घटनेप्रकरणी राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश यंत्रणांना दिले आहेत. तसंच दोषींवर लवकरात लवकर कारवाई केली जाईल, असं म्हणत पीडित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना आश्वस्त केलंय.
घटनेविरोधात संताप
20 जुलै रोजी सुराणा गावातील सरस्वती विद्या मंदिरात या विद्यार्थ्याला शिक्षकाने मारहाण केली होती. तिसरी शिकणारा दलित विद्यार्थ्याने मटक्याला स्पर्श केला आणि पेल्यातून पाणी प्यायला, म्हणून त्याला मारहाण करण्यात आली असल्याचं वृत्त समोर आलंय. शाळेचे संचालक छैल सिंह यांनी विद्यार्थ्याला मारहाण केली होती. शिवाय त्याला जातिवाचक शिविगाळही करत अपमानित केलं होतं. या मारहाणीत विद्यार्थ्याच्या डाव्या कानाला आणि डोळ्याला गंभीर जखमा झाल्या होत्या. या घटनेवरुन दलित नेते आणि भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनीही ट्वीट करत सवाल उपस्थित केलेत.