आधी वडील गेले, आता लग्नाच्या तोंडावर लेकाचाही मृत्यू, बाईक अपघातात बालमित्रांचा करुण अंत
मोहित सोमवारी संध्याकाळी सात वाजता कपिलसोबत स्कूटीवरुन घरातून निघाला होता. कोणाला तरी पैसे द्यायचे आहेत, असं सांगून दोघंही निघाले होते. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता अजमेर रोडवरील पुलावर अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कूटीला धडक दिली आणि कार चालक पसार झाला.
जयपूर : भरधाव वाहनाने धडक दिल्याने दोघा दुचाकीस्वार तरुणांचा मृत्यू (Accident) झाला. राजस्थानातील (Rajasthan) जयपूरमधील अजमेर रोडवर असलेल्या पुलावर ही घटना घडली. अपघातात मृत्युमुखी पडलेले तरुण हे बालपणापासून घट्ट मित्र होते. अपघातानंतर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोन्ही तरुणांना वाचवण्याचा प्रयत्न पादचाऱ्यांनी केला. मात्र एकाचेही प्राण वाचवता आले नाहीत. यानंतर दोन्ही मित्रांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले. दोघांपैकी एका तरुणाचे दोन महिन्यांनी लग्न होणार होते. विशेष म्हणजे त्याच्या वडिलांचे अवघ्या काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. या घटनेने तरुणांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल खटाणा (32 वर्ष) आणि मोहित शर्मा (34 वर्ष) अशी अपघातात ठार झालेल्या तरुणांची नावं आहेत. दोघेही जयपूरमधील पुरानी बस्ती येथील रहिवासी होते. मोहित सोमवारी संध्याकाळी सात वाजता कपिलसोबत स्कूटीवरुन घरातून निघाला होता. कोणाला तरी पैसे द्यायचे आहेत, असं सांगून दोघंही निघाले होते. त्यानंतर दुपारी 12.30 वाजता अजमेर रोडवरील पुलावर अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कूटीला धडक दिली आणि कार चालक पसार झाला.
एकामागून एक दोघांचाही मृत्यू
या अपघातात कपिल आणि मोहित गंभीर जखमी झाले होते. दोघांचीही डोकी फुटली होती. बराच वेळ ते रस्त्यावर पडून राहिल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला होता. या परिसरात गस्त घालणारे पोलीस अधिकारी पृथ्वीपाल सिंग घटनास्थळावर गर्दी पाहून पोहोचले. तेव्हा तिथे उपस्थित असलेले लोक दोन्ही तरुणांना मदत करत होते. त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही रुग्णवाहिकेतून सवाई मानसिंग रुग्णालयात पाठवले. तिथे कपिलला मृत घोषित करण्यात आले. तर मंगळवारी सकाळी मोहितचाही मृत्यू झाला.
कपिलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
कपिलचं 24 एप्रिलला लग्न होणार होतं. कपिलच्या घरी लग्नाची तयारी सुरू झाली होती. पण वरात निघण्याऐवजी त्याची अंत्ययात्रा काढण्याची वेळ आली. मोहितच्या वडिलांचे काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. त्यामुळे कुटुंबाची जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली होती.
कपिल आणि मोहितच्या अकस्मात मृत्यूने त्यांच्या कुटुंबीयांना धक्का बसला आहे. दोघांमध्ये लहानपणापासूनच घट्ट मैत्री होती. ते कायम एकत्र असायचे आणि आयुष्याच्या शेवटच्या क्षणीही ते एकत्र राहिले. दोघांनी एकत्र जगाचा निरोप घेतला. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत.
संबंधित बातम्या :
बसची बाईकला जोरदार धडक, तिघा जीवलग मित्रांचा करुण अंत
महाशिवरात्री यात्रा अखेरची ठरली, मित्राला सोडून परतताना बाईक झाडावर आदळली, तरुणाचा जागीच अंत
डिझेल संपल्याने ट्रॅक्टर थांबलेला, मागून बाईक जोरात आदळली, तरुणाचा जागीच मृत्यू