आधी वाटलं शालूचा मृत्यू अपघाती आहे, पण तो तर घातपात! कसं निष्पन्न झालं? वाचा
नैसर्गिक मृत्यू = 1 कोटी, अपघाती मृत्यू = 1.90 कोटी! विम्याच्या पैशांसाठी पतीचं पत्नीसोबत हडळकृत्य
जयपूर : पत्नीचा अपघाती मृत्यू झाला तर 1 कोटी 90 लाख रुपये इतकी विम्याची रक्कम मिळावी, म्हणून पतीने तिची हत्या घडवून आणली. पत्नीचा अपघातात मृत्यू झाल्याचा बनावही रचला. पण हे सगळं प्रकरण अखेर पोलिसांच्या तपासात उघडकीस आलं. चांद आणि शालू यांचं एकमेकांशी लग्न झालं होतं. चांद याने बायकोचा विमा काढला. या विम्याच्या निर्देशांनुसार, जर व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपये मिळतील. आणि जर अपघाती मृत्यू झाला तर 1 कोटी 90 लाख रुपये इतकी रक्कम मिळाली. विम्याचे 1.90 कोटी पैसे मिळवण्याच्या हव्यासापोटी चांद याने बायकोच्या हत्येसाठी तिचा अपघात घडवून आणला होता.
कसा रचला कट?
तो दिवस होता 5 ऑक्टोबर 2022. चांदची पत्नी शालू देवळात जायला निघाली होती. आपला चुलत भाऊ राजू याच्यासोबत ती दुचाकीवर जायला निघाली. पण वाटेत एका एसयूव्ही कारने त्यांच्या दुचाकीला चिरडलं.
या भीषण अपघातामध्ये शालूचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेला तिच्या भावाची मृत्यूशी सुरु असलेली झुंजही अपयशी ठरली. उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.
हा एक अपघात असल्याची नोंद सुरुवाीला करण्यात आली. पण शालूच्या कुटुंबीयांना संशय आला. त्यांना हा अपघात नसून घातपात आहे, असा वाटलं आणि त्यांना पोलिसांकडे याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली.
चांद यानेच आपल्या पत्नीला संपवण्यासाठी हे कारस्थान रचल्याचा संशय शालू्च्या कुटुंबीयांना होता. विम्याच्या पैशांसाठी चांद याने हे कृत्य केलं असावं, अशी शंका पोलिसांनाही आली. अखेर पोलिसांच्या तपासात ही शंका खरी असल्याचं समोर आलं.
शालूचा 40 वर्षांसाठीचा विमा चांद याने काढला होता. या विम्याच्या पैशांसाठी त्याने पत्नीला संपवण्यासाठी तिच्या मृत्यूचा घाट घातला.
10 लाखांची सुपारी
शालूची हत्या करण्यासाठी मुकेश सिंह राठोड या कुख्यात गुन्हेगाराला त्याने सुपारी दिली. 10 लाख रुपयांची सुपारी मिळालेल्या मुकेश याने आपल्या साथिदारांना सोबत घेतलं आणि भरधाव एसयूव्ही कार घेऊन शालू आणि राजू या बहीणभावांना रस्त्यावर चिरडलं. या कामासाठी साडे पाच रुपये एडव्हान्सही मुकेश याने घेतला होता.
2015 साली शालूचं चांदसोबत लग्न झालं होतं. लग्नानंतर या दाम्पत्याला दोन मुली झाल्या. आपली इच्छा पूर्ण झाल्यानं तू सलग 11 दिवस हनुमान मंदिरात कुणालाही काहीही न सांगता जात जा, असं चांद याने शालूला सांगितलं. पतीचं ऐकून ती हनुमान मंदिरात जायला निघाली. पण या दरम्यानच तिचा अपघातात मृत्यू झाला. महत्त्वाचं म्हणजे हा अपघात घडवून आणण्यात आला होता, असंही तपासातून समोर आलं.
हा अपघात घडला तेव्हा शालूचा जागीच मृत्यू झाला. चांद याने स्वतःच्या डोळ्यांदेखत हा अपघात पाहिला होता. पत्नी रक्ताच्या थारोळ्यात पडली आहे, विव्हळतेय आणि तडफडतेय, तिची मृत्यूशी झुंज सुरु आहे, हे चांद याने स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं होतं. ज्या भरधाव एसयूव्हीने शालू आणि तिच्या भावाच्या दुचाकीला धडक दिली होती, त्याच्या मागून चांदही दुसऱ्या बाईकवरुन त्यांचा पाठलाग करत होता.
या घटनेप्रकरणी पोलिसांनी मुकेश राठोड आणि अन्य दोघांना अटक करण्यात आलीय. तर एसयूव्हीचा मालक राकेश सिंह आणि सोनू यांनाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर दोघे फरार आहे.