मिशन ‘गोल्ड’ फेल.. एअरपोर्टवर तब्बल 12 किलो सोनं जप्त, किंमत ऐकून व्हाल हैराण ! पण कुठे झाली ही कारवाई ?

| Updated on: Oct 04, 2023 | 11:55 AM

Gold Smuggling : गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर सोन्याच्या तस्करीची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. या घटना वाढतच असून जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 12 किलो सोनं जप्त करण्यात आलं.

मिशन गोल्ड फेल.. एअरपोर्टवर तब्बल 12 किलो सोनं जप्त, किंमत ऐकून व्हाल हैराण ! पण कुठे झाली ही कारवाई ?
Follow us on

जयपूर | 4 ऑक्टोबर 2023 : सोन्याच्या तस्करीसाठी (gold smuggling) विविध आयडिया लढवणाऱ्या अनेक तस्करांना गेल्या काही दिवसांत अटक करण्यात आली आहे. त्यातच जयपूर विमानतळावरही मोठी कारवाई करण्यात आली असून तेथून मोठ्या प्रमाणात सोनं जप्त (gold seized) करण्यात आलं. जयपूर गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने विमानतळावर सुमारे 12 किलो सोनं जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या सोन्याची किंमत सुमारे 8 ते 10 कोटी रुपये आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एवढ्या मोठ्या प्रमाणात जप्त केलेले सोने दुबईतून विमानाने तस्करी करण्यात येत होते. जयपूर क्राइम ब्रँचने तस्करी प्रकरणी 6 आरोपींना अटक केली आहे.

गुन्हे शाखेचे विशेष पथक जवाहर सर्कल पोलिस ठाणे येथे आरोपींची चौकशी करत आहे. सध्या सोन्याच्या तस्करीची प्रकरणे रोजच समोर येत आहेत. गेल्या महिन्यात, सीमाशुल्क विभागाच्या पथकाने 24 तासांच्या आत दोन मोठ्या तस्करीच्या प्रकरणांमध्ये दुबई येथून आणले जाणारे कोट्यवधी रुपयांचे सोने जप्त केले होते.

24 तासांत सोन्याच्या तस्करीच्या दोन मोठ्या घटना समोर

गेल्या महिन्यात, कस्टम विभागाच्या पथकाने जयपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून पेस्ट स्वरूपात आणले जाणारे 5 किलोंचं सोन जप्त केलं होतं. त्याची किंमत अंदाजे 3 कोटी रुपये होती. दुबईहून आणलेल्या सोन्याची तस्करी करताना एका तरूणाला अटक करण्यात आली होती. यापूर्वीही तो अनेकदा दुबईला गेला होता. परत येताना अनेक जण त्यांच्या ओळखीच्या व्यक्तींसाठी काही सामान त्याच्याकडे द्यायचे. मात्र आपल्या बॅगेतील सामानात सोनं आहे, याची काहीच कल्पना नव्हती असे त्याने स्पष्ट केले.

तर दुसऱ्या एका प्रकरणात, डीआरआय अधिकाऱ्यांनी एक तस्कराकडून 2 किलो 700 ग्रॅम सोने जप्त केले होते. त्याची किंमत सुमारे 1 कोटी 40 लाख रुपये इतकी होती. मूळचा चुरू येथील रहिवासी असलेल्या तस्कराने सोनं अंतर्वस्त्रामध्ये लपवून आणलं होतं.

मुंबई विमानतळावरही केली मोठी कारवाई

गेल्या काही दिवसांमध्ये मुंबई विमानतळावरही मोठी कारवाई करत कोट्यवधी रुपयांचं सोन जप्त करण्यात आलं होतं. एका महत्त्वपूर्ण कारवाईत, मुंबई एअर इंटेलिजेंस युनिट (AIU) ने मुंबई विमानतळावर सोन्याची तस्करी करण्याच्या प्रयत्ना असलेल्या एका परदेशी महिलेला अटक केली होती. तिने तिच्या अंतर्वस्त्रात लपवून कोट्यवधींचे सोन आणलं. तर त्याआधी नागपूरमध्ये तस्करीचा असाच प्रकार उघडकीस आला होता. नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या एका इसमाच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्याच्या सामानाची तपासणी केली असता, त्यामध्ये कॉफी मेकर मशिन सापडलं. आणि त्याच्या आत तब्बल दोन कोटी रुपये किमतीचं सोनं होतं.