अंगठीत दोष आहे, त्यामुळे तुम्हाला त्रास होतोय सांगितले; चोरट्यांची शक्कल पाहून पोलीसही चक्रावले !
पादचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा करायचे. एका सेल्समनलाही दुकलीने अशा प्रकारे गंडा घातला. अंगठीतील दोष दूर करतो सांगत अंगठी मागितली आणि पोबारा केला. पण इथेच त्यांचा कारनामा उघड झाला.
डोंबिवली / सुनील जाधव : पादचाऱ्यांना बोलण्यात गुंतवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू घेऊन पोबारा करणाऱ्या दुकलीला डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी अखेर बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींकडून एकूण 1 लाख 47 हजार 500 रूपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, 2 गुन्हे देखील उघडकीस आणले असल्याचे वपोनि सचिन सांडभोर यांनी सांगितले. मेहमूद अस्लम शेख आणि आयुब ताज शेख अशी अटक आरोपींची नावे असून, हे दोघेही मुंब्रा येथील आझादनगर झोपडपट्टीतील रहिवासी आहेत. दोन्ही आरोपींना कल्याण कोर्टात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे. एका सेल्समनला फसवल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर चोरट्यांचा हा कारनामा उघडकीस आला.
अंगठीत दोष आहे सांगत सेल्समनच्या दोन्ही अंगठ्या घेऊन पसार
शहाड येथील सद्गुरू अपार्टमेंटमध्ये राहणारे हनुमंत भिमराव गोसावी हे पेशाने सेल्समन आहेत. गोसावी हे 3 एप्रिल रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास डोंबिवली पूर्वेकडील कल्याण रोडला असलेल्या टिळक चौकातील अनिल मेडीकल स्टोअर्सकडे जात होते. इतक्यात दोन अनोळखी इसमांनी त्यांना रस्त्यात थांबवले आणि त्यांच्या बोटातील सोन्याच्या अंगठीत काहीतरी दोष असल्याचे सांगितले. तसेच तो दोष काढून देण्याच्या बहाण्याने चोरट्यांनी त्यांच्याकडील अंगठ्या काढून घेतल्या आणि तेथून पसार झाले.
सेल्समनच्या तक्रारीनंतर चोरट्यांचे कारनामे उघड
चोरट्यांनी आपल्याला गंडा घातल्याचे लक्षात येताच गोसावी यांनी रामनगर पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली. गोसावी यांच्या तक्रारीनंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि बळवंत भराडे, हवालदार सुनिल भणगे, सचिन भालेराव, तुळशीराम लोखंडे, रविंद्र कर्पे, विशाल वाघ, हनुमंत कोळेकर आणि शिवाजी राठोड या पथकाने तांत्रिक कौशल्य वापरून या दोन्ही भामट्यांना वेगवेगळ्या ठिकाणांहून अटक केली. चोरट्यांनी याआधीही दोघांना अशा प्रकारे गंडा घातल्याचे तपासात उघड झाले आहे.