ट्रेनने यायचा आणि सायकलीवर जायचा, ‘असा’ अडकला पोलिसांच्या जाळ्यात
मौजमजेसाठी सायकल चोरणाऱ्या चोरट्याला सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपीकडून 13 सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.
कल्याण / सुनील जाधव : मौज मस्तीसाठी सायकल चोरी करणाऱ्या एका सायकल चोराला रामनगर पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने बेड्या ठोकल्या. हसमितसिंग जसमेरसिंग सैनी असे या आरोपीचे नाव आहे. गर्लफ्रेंडसोबत मजा करण्यासाठी दिव्यातून आपल्या अल्पवयीन साथीदारांसह ट्रेनचा प्रवास करत तो डोंबिवलीला यायचा. सोसायटीमध्ये उभ्या असलेल्या महागड्या सायकलीचे लॉक तोडून त्या सायकली चालवत दिव्यात नेऊन त्या कमी किंमतीत विकायचा. यातून मिळालेल्या पैशाने गर्लफ्रेंडसोबत मौजमस्ती करायचा.
आरोपींकडून 12 सायकली जप्त
डोंबिवली रामनगर पोलिसांनी या आरोपीकडून 1 लाख 30 हजार रुपये किंमतीच्या 13 सायकल केल्या जप्त केल्या आहेत. या आरोपींनी अजून किती सायकली चोरला याचा तपास पोलीस करत आहेत. कल्याण डोंबिवली परिसरात सायकल चोरांचा धुमाकूळ वाढला असून कल्याण डोंबिवलीकर सायकल चोरांना अक्षरश: वैतागले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून डोंबिवलीतील रामनगर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत अनेक सायकल चोरीचे गुन्हे रामनगर पोलीस ठाण्यात दाखल झाले आहेत.
सीसीटीव्हीच्या आधारे चोरट्यांना पकडले
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, सपोनि बळवंत भराडे, पोहवा. विशाल वाघ पोहवा. भणगे, सचिन भालेराव, लोखंडे, कोळेकर, राठोड यांची विशेष टीम बनवून शहरातले सीसीटीव्ही तपासणी करत चोरट्याचा शोध सुरू केला होते.
याच दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीचे आधारे आरोपी ज्या रस्त्यावरून येत होते, त्यावर पाळत ठेवून संशयित 19 वर्षीय हसमितसिंग जसमेरसिंग सैनी आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत विचारपूस केली असता, दोघांनी चोरीची कबुली दिली. विशेष म्हणजे हे आरोपी दिव्यात राहत असून, दिव्यातून ट्रेनचा प्रवास करून डोंबिवलीत यायचे. डोंबिवलीमध्ये सोसायट्यांमधून महागड्या सायकलींचे लॉक कटावणीच्या मदतीने तोडून त्या सायकली चालवत दिव्यापर्यंत न्यायचे. दिव्यात त्या सायकली कमी किमतीत विकायचे.