Dombivali Theft : डोंबिवलीत रामनगर पोलिसांची चोरट्यांवर कारवाई, 22 महागडे मोबाईल आणि दहा सायकल जप्त
कल्याण झोन 3 मधील आठही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष तपास पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके रात्रंदिवस चोरट्यांच्या मागावर असून अनेक गुन्हे उघड करत आहे.
डोंबिवली : डोंबिवली रामनगर पोलिसांनी दोन अल्पवयीन आरोपीं (Juvenile Thieves)ना ताब्यात घेत त्यांच्याकडून तब्बल 22 महागडे मोबाईल (Mobile) आणि दहा सायकल (Cycles) हस्तगत केल्या आहेत. हे दोघे शहरात फिरायचे व संधी साधत घराबाहेर उभी असलेली सायकल तसेच घराच्या खिडकीत ठेवलेले मोबाईल घेऊन पसार व्हायचे. गस्तीदरम्यान सायकल घेऊन जात असताना पोलिसांनी त्यांना अडवून चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. यामुळे पोलिसांना संशय आल्याने त्यांना ताब्यात घेत चौकशी केली असता चोरीच्या गुन्ह्यांची उकल झाली. आरोपींनी अजून किती सायकली आणि मोबाईल चोरले आहेत याची पोलीस चौकशीत करत आहेत.
वाढती गुन्हेगारी उघडकीस आणण्यासाठी पोलिसांची विशेष टीम
कल्याण डोंबिवलीत परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी, जबरी चोरी, घरफोडी, दरोडा, वाहन चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. कल्याण झोन 3 अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे व पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ आणि कल्याण डोंबिवलीचे सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील आणि सुनील कुऱ्हाडे यांनी विशेष टीम बनवत सर्व पोलीस स्थानकाला लवकरात लवकर गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले. त्यानुसार कल्याण झोन 3 मधील आठही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विशेष तपास पथके तयार करण्यात आली आहेत. ही पथके रात्रंदिवस चोरट्यांच्या मागावर असून अनेक गुन्हे उघड करत आहे. असाच एक गुन्हा डोंबिवलीतील रामनगर पोलिसांनी उघडीस आणला आहे.
अल्पवयीन मुलांना ताब्यात घेत चौकशी केली असता गुन्हे उघडकीस
या पथकाने दोन अल्पवयीन मुलांना सायकल घेऊन जात असताना हटकले. यावेळी मुलांनी उडवा उडविची उत्तरे दिल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांची सायकल व त्यांच्याजवळील मोबाईल चोरीचा असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला असता हे दोघे मौज मस्तीसाठी शहरात फिरत घराबाहेर ठेवलेल्या सायकल व खिडकीत ठेवलेले मोबाईल संधी साधत घेऊन पसार होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या दोघांकडून 22 महागडे मोबाईल आणि 10 सायकल जप्त केल्या आहेत. या दोघांनी अजून किती चोऱ्या केल्यात याची चौकशी पोलीस करत आहेत. (Ramnagar police seized 22 expensive mobile phones and 10 bicycles from juvenile thieves in Dombivali)