कोकण हादरलं! 7 वर्षांच्या मुलीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, आत्महत्या की हत्या?
Ratnagiri Crime News : लांज्यातील राजेश चव्हाण यांची मुलगी असलेल्या सात वर्षांची आर्या हीच्या मृत्यू संपूर्ण गावात खळबळ माजलीय.
रत्नागिरी : अवघ्या सात वर्षांच्या मुलीच्या गूढ मृत्यूनं संपूर्ण लांजा तालुका (Lanja Crime News) हादरुन गेलाय. रत्नागिरीत जिल्ह्यातील (Ratnagiri Crime News) लांजा तालुक्यात असलेल्या कोर्ल गावात धक्कादायक घडली. सात वर्षांच्या मुलीनं गळफास घेत आत्महत्या केली असल्याचं सांगितलं जातंय. मात्र कुटुंबीयांनी या मुलीची हत्या करण्यात आली असल्याचा गंभीर आरोप केलाय. आर्या राजेश चव्हाण (Arya Rajesh Chavhan) असं सात वर्षांच्या मृत्यू झालेल्या मुलीचं नाव आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेतलाय. रत्नागिरी सिव्हिल रुग्णालयात या मुलीचा मृतदेह पोस्टमॉर्टेमसाठी पाठवण्यात आल्यात. गळफास लावून घेत राहत्या घरी या मुलीनं आत्महत्या केली असल्याचं सांगण्यात आलं. मात्र सात वर्षांची मुलगी आत्महत्या कशी काय करु शकते? तिचा खून झालाय? असा आरोप मृत मुलीच्या नातलगांनी केलाय. त्यामुळे या मुलीच्या मृत्यूचं गूढ वाढलंय.
राहत्या घरात मृतदेह…
लांज्यातील राजेश चव्हाण यांची मुलगी असलेल्या सात वर्षांची आर्या हीच्या मृत्यू संपूर्ण गावात खळबळ माजलीय. या मुलीचा मृतदेह राहत्या घरात गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आलाय. त्यामुळे या मुलीनं आत्महत्या केली, असं सांगण्यात आलं. सात वर्षांच्या मुलीनं राहत्या घरात गळफास लावून घेतल्याचं दिसल्यानं सगळ्यांच मोठा धक्का बसलाय. ही बाब निदर्शनास आल्यानंतर पोलिसांना तत्काळ कळवण्यात आलं. पोलिसांकडून आता याप्रकरणी अधिक तपास करण्याची मागणी केली जातेय.
वडिलांची 2 लग्न आणि मुलीच्या मृत्यूचं गूढ
या मुलीच्या नातेवाईकांना आर्याने आत्महत्या केली नसून तिची हत्या झाली असल्याचा गंभीर आरोप केलाय. या संपूर्ण प्रकरणाची पोलिसांनी कसून चौकशी करावी, असंही त्याचं म्हणणंय. आर्याच्या वडिलांनी दोन लग्न केली आहेत. त्यांच्या दुसऱ्या पत्नीला तीन मुलं आहेत. तर आर्या ही पहिल्या बायकोपासून झालेली सगळ्यात लहान मुलगी होती.
राहत्या घरात एवढी लहान मुलगी स्वतःला गळफास कसा काय लावू घेऊ शकते, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्यामुळे ही हत्याच असल्याचा दावा करत पोलिसांनी याप्रकरणी तातडीनं योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. ‘पहाटे दोन वाजल्यापासून आम्ही दाद मागतोय, पण आम्हाला कुणीच दाद देत नाही’, असंही मृत मुलीच्या नातलगांनी म्हटलंय.
आता पोलीस तपासातून नेमकी काय माहिती समोर येते, हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, या संपूर्ण घटनेप्रकरणी आर्याचे वडील राजेश चव्हाण यांचे नेमकं म्हणणं काय आहे, ते कळू शकलेलं नाही.