Ratnagiri News : आता ग्रामीण भागातही सेक्सटॉर्षणचे लोण, सोशल मीडियावरील मैत्री तरुणाला पडली महागात
सोशल मीडियावर मैत्री करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. या मैत्रीमुळे तरुणाला जीव गमवण्याची वेळ आली आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली.
चिपळूण / 31 ऑगस्ट 2023 : सेक्सटॉर्षणचे लोण आता ग्रामीण भागातही पसरत आहेत. रत्नागिरीतील चिपळूण तालुक्यात सेक्सटॉर्षणची घटना उघडकीस आली आहे. सोशल मीडियावर ओळख करत तरुणाला सेक्सटॉर्षणमध्ये अडकवण्यात आले. यानंतर वारंवार धमकी देत आणि ब्लॅकमेल करत त्याच्याकडे पैशांची मागणी करण्यात येत होती. अखेर या त्रासाला कंटाळून 19 वर्षीय तरुणाने आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किशनराम भंवरलाल पातीर असे मुख्य आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे.
तरुणासोबत नेमकं काय घडलं?
राजस्थानमधील टोळीने चिपळूणमधील 19 वर्षीय तरुणाशी सोशल माडियाच्या माध्यमातून ओळख केली. मग त्याला सेक्सटॉर्षणच्या जाळ्यात अडकवले. मग त्याचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी देत त्याच्याकडे पैशांची मागणी केली. तरुणाने आरोपींना 11 हजार 500 रुपये दिले. मात्र त्यानंतर आरोपी तरुणाला धमकावतच होते.
छळाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलले
अखेर तरुण या छळाला कंटाळला आणि त्याने टोकाचे पाऊल उचलले. तरुणाने स्वतःचे जीवनच संपवले. घटनेची माहिती मिळताच अलोरे-शिरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास करत मुख्य आरोपी किशनराम पातीर याच्यासह अन्य तिघा अज्ञात इसमांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.