नालासोपारा / विजय गायकवाड : नालासोपाऱ्यातून अपहरण झालेल्या एक वर्षाच्या मुलीची सुखरुप सुटका करण्यास पोलिसांना यश आले आहे. अपहरण करून फरार झालेल्या माथेफिरूला पोलिसांनी बिहार राज्यातून अटक केली आहे. आरोपीच्या तावडीतून मुलीची सुटका करून सुखरुप आई वडिलांच्या ताब्यात दिले. नालासोपारा पूर्व आचोळा डोंगरी येथील राहत्या घरातून 15 फेब्रुवारी 2023 रोजी आईच्या समोरून फिरवायला नेतो म्हणून माथेफिरूने मुलीचे अपहरण करून फरार झाला होता. सुमेंद्रकुमार सुकलदास मंडल असे आरोपीचे नाव आहे.
मुलीला घेऊन जाताना आरोपी हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. आचोळा पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषण करून 5 दिवसात बिहार राज्यातून पीडित मुलीसह आरोपीला ताब्यात घेतले आहे. सुमेंद्रकुमार सुकलदास मंडल असे आरोपीचे नाव असून, तो नालासोपारा परिसरात सुरक्षारक्षकाचे काम करीत होता.
सुरक्षारक्षकाचे काम करीत असताना झालेल्या ओळखीचा फायदा घेऊन त्याने मुलीचे अपहरण केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पण अपहरण का केले हे मात्र स्पष्ट कारण समोर आले नाही. आचोळा पोलिसांनी त्याला अटक करून, वसई न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांनी सांगितले.