Kalyan Crime : भाडे कमी आकारले म्हणून रिक्षाचालकाला मारहाण, चौघांविरोधात गुन्हा दाखल
कल्याण स्थानकात रिक्षाचालकांची मुजोरगिरी वाढली आहे. वाट्टेल ते भाडे आकारुन प्रवाशांना नाहक त्रास देण्याचे काम रिक्षाचालक करतातच. परंतु, कमी भाडे आकारणाऱ्या रिक्षाचालकांनाही सोडत नाहीत.
कल्याण / 19 ऑगस्ट 2023 : कमी भाडे आकारले म्हणून चौघांनी एका रिक्षाचालकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये उघडकीस आली आहे. या मारहाणीत रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी चौघांविरोधात महात्मा फुले पोलीस ठाण्यात भादवि कलम 326, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशफाक मोहम्मद इब्राहिम शेख असे मारहाण झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर अरमान शेख, अरबाज शेख, रमेश गुप्ता, अफजल खान अशी आरोपींची नावे आहेत. कल्याण पश्चिम स्थानकाजवळ काल पहाटे ही घटना घडली.
कमी भाडे आकारले म्हणून मारहाण
फिर्यदी अशफाक शेख हा कमी भाड्यात कल्याणहून भिवंडीला चालला होता. यामुळे आरोपींना राग आला त्यांनी संगनमत करत अशफाकला मारहाण केली. स्टीलच्या रॉडने हातावर आणि डोक्यावर वार केले. तसेच तू कल्याणमध्ये धंदा कसा करतो, भाडे कसे मिळवतो, तुला सोडणार नाही अशी धमकी दिली. यानंतर पीडित रिक्षाचालकाने महात्मा फुले पोलीस चौकी गाठत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.
रिक्षाचालकांच्या या मुजोरीमुळे इमानदार लोकांना धंदा करणे अवघड झाले आहे. अव्वाच्या सव्वा भाडे आकारुन हे रिक्षाचालक ग्राहकांना वेठीस धरतात. आधीच रिक्षाचालकांच्या मुजोरीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यात इमानदारीने धंदा करणाऱ्या अशा रिक्षाचालकांना अशा प्रकारे मारहाण होत असल्याने संताप व्यक्त करण्यात येत आहे.