‘रिलायन्स ज्वेल्स’ दरोडेखोरांच्या रडारवर?, गेल्या चार महिन्यांत चार दरोडे
सांगलीतील रिलायन्स ज्वेल्सच्या दुकानात सशस्त्र दरोडा पडल्यानंतर पोलीस दल अॅक्शन मोडमध्ये आले आहे. पोलीस वेगाने या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तपासादरम्यान पोलिसांना आणखी काही माहिती हाती लागली.
सांगली : सध्या ‘रिलायन्स ज्वेल्स’ हे दरोडेखोरांच्या रडारवर असल्याचे दिसून येत आहे. गेल्या चार महिन्यांत विविध शहरांत रिलायन्स ज्वेल्सच्या चार दुकानात दरोडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत. सांगलीतील रिलायन्स ज्वेल्समध्ये पडलेल्या दरोड्यानंतर पोलीस तपासात ही माहिती समोर आली आहे. सांगली पोलिसांची आठ पथके राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, तेलंगणा येथे रवाना झाली आहेत. दरोडेखोर देशाबाहेर पळून जाऊ नयेत यासाठी नेपाळ सीमा देखील सील केली आहे. महाराष्ट्र पोलिसांसह देशभरातील तपास यंत्रणेचा शोध पथकात समावेश असल्याचे सूत्रांकडून कळते. दरम्यान, चोरीतील सोने विदेशात जाण्याची भीतीही पोलिसांनी व्यक्त केली आहे.
सांगलीतील दरोड्यानंतर तपासादरम्यान चार घटना उघड
वसंतदादा मार्केट यार्डाजवळील रिलायन्स ज्वेल्स या दुकानातून रविवारी भरदिवसा दरोडेखोरांनी अंदाजे 22 किलो वजनाचे 14 कोटी रुपयांचे सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने लुटले. या दरोड्यात वापरलेली मोटार भोसे (ता. मिरज) येथील शेतात मिळून आली. एक दुचाकी मिरज बायपास रस्त्याला सापडली. मोटारीत चोरट्यांचे कपडे, बॅग आणि दोन पिस्तूल पोलिसांना सापडले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दोन दिवसांपासून सांगलीत तळ ठोकला आहे. तपासावर त्यांनी लक्ष ठेवले आहे.
आधी रेकी करायचे, मग दरोडा टाकायचे
गेल्या फेब्रुवारीपासून आतापर्यंत देशभरात चार ठिकाणी रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल आणि ओडिशा या ठिकाणी पडलेला दरोडा आणि सांगलीतील दरोड्याची पद्धत जवळपास सारखीच आहे. दिल्लीतील दरोड्यात तिघांना अटक झाली आहे. पण त्यांच्याकडून सूत्रधार कोण, याबाबत फारशी माहिती मिळालेली नाही. सांगलीत पडलेला दरोडा चौथा आहे. दरोडेखोरांनी आधीच रिलायन्स ज्वेल्सची रेकी केली होती. त्यांचे काही साथीदार सकाळपासून दुकानाबाहेर होते, तर काहीजण शहरात फिरत होते अशीही माहिती मिळते.