व्हॉट्सअपवर आरपीएफच्या 19800 कॉन्स्टेबल पदांच्या भरतीची अफवा
सध्या देशभरात प्रचंड बेकारी असल्याने सरकारी नोकरी मिळावी यासाठी जो तो प्रयत्न करीत असतो. याचा फायदा घेत काही समाजकंटकांनी रेल्वे सुरक्षा बलात तब्बल 19800 पदांची मोठी भरती असल्याची जाहीरात समाजमाध्यमावर फिरविल्याचे उघडकीस आले आहे.
नवी दिल्ली : रेल्वे सुरक्षा दल (RPF) मध्ये पोलीस शिपाई ( CONSTABLE ) पदाच्या 19800 जागांसाठी भरती असल्याचे संदेश व्हॉट्सअपवर फिरत असून या संदेशात कोणतेही तथ्य नसल्याचा खुलासा रेल्वेमंत्रालयाने केला आहे. सध्या प्रचंड बेकारी वाढली असल्याने समाजकंटकांमार्फत अशाप्रकारचे संदेश सोशल मिडीयावर फिरत असल्याने तरुणांनी खात्री केल्या शिवाय अशा जाहिरातींना भूलु नये असे आवाहन करण्यात येत आहे.
सोशल मिडियात रेल्वे सुरक्षा बलातील पोलीस शिपायांच्या भरतीबाबत एक बनावट संदेश प्रसारित केला जात आहे. यास भुलून तरूणांनी कोणाशीही संपर्क करुन आपली फसवणूक करून घेऊ नये यासाठी रेल्वे सतर्क झाली आहे. रेल्वेने एक निवेदन जारी केले आहे. या निवेदनाद्वारे रेल्वेने सूचित केले आहे की आरपीएफ किंवा रेल्वे मंत्रालयाने त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर अथवा कोणत्याही छापील किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे अशी कोणतीही अधिसूचना जारी केलेली नसल्याचे स्पष्ठ केले आहे. ही बातमी खोटी आहे आणि त्याकडे सर्वांनी दुर्लक्ष करावे,असे रेल्वेने म्हटले आहे.
भारतीय रेल्वे की संपत्ति, रेलवे स्टेशन त्याच बरोबर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारीसाठी रेल्वेचे स्वतंत्र रेल्वे सुरक्षा बल आहे. ज्याप्रकारे सैन्यात भरती होण्याचे तरूणांचे स्वप्न असते तसे रेल्वे सुरक्षा बलात भरती होण्यासाठी तरूणांची चढाओढ सूरू असते. त्याचा फायदा घेऊन कोणीतरी रेल्वे सुरक्षा बलात 19800 कॉन्स्टेबलच्या पदांची भरती सुरू असल्याचे खोटे संदेश समाजमाध्यमांमध्ये पसरवले जात आहेत. रेल्वे सुरक्षा बलात एवढ्या मोठ्या प्रमाणात भरती केली जात असल्याचा संदेश देशभरातील तरुणांमध्ये खळबळ उडाली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने तातडीने खुलासा केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य पाहुन रेल्वे मंत्रालयाने एक प्रसिद्धी पत्रक जारी करीत या वृत्तांचे खंडन केले आहे. रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे की समाजमाध्यमावर फिरत असलेला संदेश खोटा असून रेल्वेने अशी कोणत्याही प्रकारच्या नोकरीची जाहीरात दिली नसल्याचे स्पष्ठ केले आहे.