सचिन वाझेंची तब्येत पुन्हा बिघडली; NIA च्या कार्यालयात मध्यरात्री डॉक्टर बोलावले?
NIA च्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री डॉक्टरांना पाचारण केले होते. हे डॉक्टर सचिन वाझे यांच्या प्रकृतीची तपासणी करून साधारण रात्री एक वाजण्याच्या सुमारास एनआयएच्या कार्यालयातून बाहेर पडले. | NIA Sachin Vaze
मुंबई: मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवण्याच्या कटातील संशयित असलेले पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडल्याची माहिती समोर आली आहे. सचिन वाझे हे सध्या राष्ट्रीय तपासयंत्रणेच्या (NIA) कोठडीत आहेत. त्यांना शनिवारी रात्री अटक करण्यात आली होती. यानंतर रविवारी विशेष न्यायालयात हजर करून NIA ने 25 मार्चपर्यंत त्यांचा रिमांड मिळवला होता. (Sachin Vaze facing health problems in NIA custody Mumbai)
मात्र, काल रात्री NIA च्या कार्यालयात सचिन वाझे यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे NIA च्या अधिकाऱ्यांनी मध्यरात्री डॉक्टरांना पाचारण केले होते. हे डॉक्टर सचिन वाझे यांच्या प्रकृतीची तपासणी करून साधारण रात्री एक वाजण्याच्या सुमारास एनआयएच्या कार्यालयातून बाहेर पडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, NIA ने यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
यापूर्वी शनिवारी रात्रीही सचिन वाझे यांची प्रकृती खालावली होती. एनआयएने त्यांची सलग 13 तास चौकशी केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांना थकवा जाणवायला लागला होता. त्यामुळे सचिन वाझे मुंबईच्या जे.जे. रुग्णालयात गेले होते. याठिकाणी त्यांना सलाईन लावण्यात आले होते, अशी माहितीही सूत्रांनी दिली होती. त्यानंतर आता सलग दुसऱ्या दिवशी सचिन वाझे यांच्यावर डॉक्टर बोलावून उपचार करण्याची वेळ आली आहे. सचिन वाझे यांच्या चौकशीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून NIA कडून त्यांची सर्वतोपरी काळजी घेतली जात आहे.
‘एनआयए’चा फास आणखी आवळला; सचिन वाझेंना 10 दिवसांची पोलीस कोठडी
मनसुख हिरेन प्रकरणामुळे चर्चेत असलेले सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) यांना एनआयएच्या विशेष न्यायालयाने रविवारी 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यामुळे आता सचिन वाझे यांची कसून चौकशी करण्याचा राष्ट्रीय तपासयंत्रणेचा (NIA) मार्ग मोकळा झाला होता.
त्यामुळे आता पुढच्या काही दिवसांत एनआयए सचिन वाझे यांच्याकडून कोणती माहिती बाहेर काढणार, हे पाहावे लागेल. आतापर्यंतच्या चौकशीत सचिन वाझे यांनी एनआयएला बरीच खळबळजनक माहिती दिली होती. त्यामुळे आता आगामी काळात याप्रकरणातील आणखी कोणत्या गोष्टी बाहेर येणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
संबंधित बातम्या:
सचिन वाझे यांचा पाठलाग होत असल्याचा दावा, वेगवेगळ्या नंबरप्लेटमुळं ‘त्या’ गाडीविषयी संभ्रम वाढला?
हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा नाही; सचिन वाझेंनी फडणवीसांचे आरोप फेटाळले
सचिन वाझेंनीच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी प्लॉट केली; NIA चा आरोप
(Sachin Vaze facing health problems in NIA custody Mumbai)