सीमा हैदर सारखी दिसणारी ही महिला कोण? अनितासोबत सचिनचे लिव्ह इन रिलेशनशिप?
सीमा हैदर आणि तिचा पती सचिन यांचे प्रेमप्रकरण समोर आल्यानंतर देशात एकच खळबळ माजली होती. मात्र, सीमा हैदर हिच्यासारखीच दिसणाऱ्या आणखी एका महिलेचे प्रेम प्रकरण समोर आले आहे. नवऱ्याच्या नको त्या कृत्यामुळे ती महिला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आली आहे.
गुजरात राज्यातील चुरू जिल्ह्यामधील राजगढ येथील एका 25 वर्षीय महिलेने आपल्या पतीला सोडून शेजारच्या तरुणासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहाण्याचा निर्णय घेतला. नवऱ्याच्या अत्याचाराला कंटाळून या महिलेने हा निर्णय घेतला. तिने पतीवर अत्याचाराचा आरोप करत त्याला घटस्फोटाची नोटीसही दिली आहे. पण, स्वतःच्या आणि आपल्या प्रेमी शेजाऱ्याच्या जीवाची तिला भीती वाटू लागल्याने तिने पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून सुरक्षेची मागणी केली आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी चर्चेत आलेल्या सीमा हैदर हिच्यासारखीच ही महिला दिसत आहे आणि तिच्या प्रियकराचे नावही सचिन आहे.
सुरक्षेची मागणी करत पोलिस अधीक्षक कार्यालयात पोहोचलेल्या या महिलेचे नाव अनिता खाटिक असे आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये तिचे लग्न झाले. तिला एक मुलगा आणि मुलगी आहे. लग्नाच्या तीन महिन्यांनंतरच पती आणि सासरच्यांनी तिचा हुंडा न दिल्याच्या कारणावरून छळ करण्यास सुरवात केली. सासरचे लोक तिच्याशी गैरवर्तन करत. तर, नवरा तिला आणि मुलांना मारहाण करायचा. सासूच्या मृत्यूनंतर त्यांचा हिंसाचार अधिकच वाढला.
सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून अखेर तिने पतीपासून वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. याच दरम्यान, सुमारे वर्षभरापूर्वी शेजारी राहणाऱ्या सचिन खाटीक याच्याशी तिची ओळख झाली. जेव्हा पती तिला मारहाण करायचा त्यावेळी सचिन तिला मानसिक बळ देत असे. अशावेळी तो घाबरलेल्या मुलांसाठी बिस्किटे, खाऊ आणत असे. काही दिवसांनी सचिन आणि अनिता यांचे मोबाईलवर संभाषण होऊ लागले. हळूहळू दोघेही एकमेकांच्या इतके जवळ आले की त्यांनी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला.
एप्रिल 2024 मध्ये अनिता हिने सचिनसोबत नवऱ्याचे घर सोडले आणि दोघेही गुजरातमधील जामनगर येथे पोहोचले. दोघेही तिथे एकत्र राहू लागले. पण, ते दोघे जामनगर येथे असल्याची माहिती तिच्या सासरच्या मंडळींना मिळाली. त्यांनी जामनगर गाठून त्या दोघांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या. तसेच, अनिता हिने घरातून सोन्याचे दागिने आणि 50 हजार रुपये चोरल्याचा आरोप केला.
अनिताने ‘तिच्या नवऱ्याचे कुटुंबीय सचिन आणि तिला गोळ्या घालून ठार करण्याची धमकी देत आहेत. सचिन तिच्या मुलांना सोबत ठेवण्यास तयार आहे. पण, त्यांना फक्त नवऱ्याच्या कुटुंबापासून सुरक्षा हवी आहे,’ अशी मागणी तिने पोलिसांकडे केली आहे.