महिलांची सुरक्षा धोक्यात, सकाळी सहापर्यंतच लेडीज डब्यात पोलीस, लोकलमध्ये सीसीटीव्ही लागणार केव्हा ?
लोकलमधील महिलांच्या डब्यातील पोलीसांचे संरक्षण रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंतच असल्याने एकटयाने लेडीज डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. सीएसएमटी ते पनवेल लोकलच्या महिलांच्या डब्यात शिरुन एका तरुणीचा विनयभंग करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. काल सकाळी 7.26 वाजताच्या पनवेल स्लो लोकलमध्ये सीएसएमटीतून लोकल सुटताच एक विकृत इसम लेडीज डब्यात शिरला आणि त्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणीने तातडीने आरडाओरडा केल्याने तो पळून गेला, नंतर सीसीटीव्हीच्या मदतीने त्याला पकडण्यात यश आले. लोकलच्या महिलांच्या डब्यातील पोलीसांचे संरक्षण सकाळी सहा वाजेपर्यंतच असल्याने एकटयाने लेडीज डब्यातून प्रवास करणाऱ्या महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे. नयाजु करोम शेख ( वय 40 ) राहणार मरचान, जि. किसनगंज, राज्य बिहार याला अटक केली आहे.
बेलापूर येथे कॉलेजला जाण्यासाठी सीएसएमटी रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. 01 वर लागलेल्या 7.26 वाजताच्या पनवेल स्लो लोकलच्या मधल्या लेडीज जनरल डब्यातून ही तरुणी प्रवास करीत होती. यावेळी डब्यामध्ये कोणीही नव्हते. ही लोकल सीएसएमटीतून सुटताच एक अनोळखी इसम त्या डब्यामध्ये चढला व त्याने त्या युवतीला स्पर्श करुन शारीरिक लगट करण्याचा प्रयत्न केला. या धक्क्याने घाबरलेल्या तरूणीने आरडाओरडा केल्याने मस्जिद स्थानकात लोकल येताच तो इसम पळून गेला.
सीसीटीव्हीचे काम रेंगाळले
या प्रकरणात सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपी नयाजू करीम शेख (वय 40 ) याला तातडीने अटक करण्यात आली आहे. परंतू सीसीटीव्हीची यंत्रणा लोकलच्या महिला डब्यात लावण्याचे काम प्रचंड रेंगाळले आहे. निर्भया फंडातून आधी सीसीटीव्ही लावण्याचा खर्च करण्यात येणार होता. रेल्वेच्या रेलटेल कंपनीने नंतर हे काम करण्याचे ठरविले. आता लोकलच्या अपंगाच्या आणि लेडीज डब्यात सीसीटीव्ही बसवण्याचे काम संबंधित लोकल पीओएच मेन्टेनन्सला दर 18 महिन्यानंतर कारखान्यात जाते. तेव्हाच तिची डागडुजी करताना सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात येत असते अशी माहीती सूत्रांनी दिली आहे.
@UNHumanRights@UN Indian Railway, Do treat such incident as wake up call & install CCTV cameras inside Mumbai Suburban trains with live monitoring by railway control room for taking immediate action for safety & security of female & disabled passengers.
— Samir Zaveri (@szaveri71) June 15, 2023
सकाळी 6 वाजेपर्यंत पोलीस संरक्षण
रेल्वेच्या डब्यामध्ये एकट्याने प्रवास करताना महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस हवालदार किंवा महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाचे सिक्युरीटीचे जवान तैनात केलेले असतात. सर्व लोकलला पोलीसांची ही सुरक्षा रोज रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत केली जाते. रात्री साधारण दीड ते पहाटे चारपर्यंत लोकल वाहतूक बंद असते. संबंधित सीएसएमटी ते पनवेल लोकलची घटना स. 7.26 वाजताची असल्याने तेव्हा महिलांच्या डब्यात अर्थातच सुरक्षा नव्हती. तसेच सकाळी डाऊन दिशेला हार्बर लाईनने तुरळक प्रवासी प्रवास करीत असतात. लोकलच्या सुरूवातीचे आणि शेवटच्या बाजूला मोटरमन आणि गार्डचे डबे असतात, त्यामुळे महिलांच्या डब्यावर त्यांचे लक्ष असते. परंतू ही घटना मधल्या लेडीज जनरल डब्यात घडली आहे. याचा फायदा आरोपीने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे रेल्वे स्थानकांवरील पोलीसांची गस्त वाढविण्यात यावी आणि अपंग तसेच महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही लावण्यात यावेत अशी मागणी आरटीआय कार्यकर्ते समीर झव्हेरी यांनी केली आहे.