Yavatmal Crime : अपहारातील 4 कोटी सोने-चांदीची यवतमाळात विक्री, मुंबईचे पथक दाखल, 2 सराफा व्यापाऱ्यांची चौकशी
नातेवाईकाने चोरलेले सोने यवतमाळातील दोन सराफा व्यावसायिकांना विकल्याची कबुली आरोपीने दिली आहे. हा आरोपी 2021 पासून यवतमाळातील सराफा व्यापाऱ्यांना चोरीचे सोने कमी भावात विकत असल्याचा संशय आहे.
यवतमाळ : फसवणुकीच्या गुन्ह्यातील तब्बल चार कोटींच्या सोने चांदीची यवतमाळात विक्री झाल्याच्या संशयावरून मुंबईचे पथक आज यवतमाळात धडकले. यावेळी त्यांनी यवतमाळातील दोन सराफा व्यापाऱ्यांची (Bullion Trader) चौकशी केली. गुन्हात तथ्य आढळल्याने यातील एकाला अटक केल्याची माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे. गजानन तनसुकराय अग्रवाल (वय 38) (Gajanan Aggarwal) रा. राजस्थान असे आरोपीचे नाव आहे. संबंधित आरोपी हा पूर्वी यवतमाळ येथे वास्तव्यास असल्याचे सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार, मुंबईमध्ये लोकमान्य टिळक पोलीस स्टेशन (Lokmanya Tilak Police Station) येथे आरोपीचा नातेवाईक असलेल्या सराफा व्यापाऱ्याच्या तक्रारीवरूनच गुन्हा दाखल आहे. सदर आरोपीला अटक केल्यानंतर चौकशीमध्ये त्याने जवळपास 1 हजार 500 ग्रॅम सोने व 35 किलो चांदी असा एकूण अंदाजे चार कोटी रुपयांचा मुद्देमाल परस्पर यवतमाळ येथील दोन व्यापाऱ्यांना विक्री केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
सराफा व्यापाऱ्यात खळबळ
आज मुंबई येथील लोकमान्य टिळक पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सुशील कुमार वंजारी हे आपल्या पथकासह यवतमाळ येथे दाखल झाले. दरम्यान, आरोपीने त्यांना यवतमाळ येथील दोन सराफा व्यापाऱ्यांची दुकाने दाखविली. यावेळी पोलिसांनी संबंधित दोन्ही दुकानांची झाडाझडती घेतली. एका दुकानांमध्ये तथ्य आढळून आल्याने संबंधित सराफा व्यापाऱ्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र या प्रकरणामुळे सराफा व्यापाऱ्यात एकच खळबळ उडाली आहे.
सेटलमेंटसाठी राजकीय दबावाचा प्रयत्न
नातेवाईकाने चोरलेले सोने यवतमाळातील दोन सराफा व्यावसायिकांना विकल्याची कबुली आरोपीने दिली आहे. हा आरोपी 2021 पासून यवतमाळातील सराफा व्यापाऱ्यांना चोरीचे सोने कमी भावात विकत असल्याचा संशय आहे. मुंबईतील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या पथकानं तुलसी ज्वेलर्स व लष्करी ज्वेलर्सची झडती घेतली. यातील एक सराफाची शहर पोलिसांनी चौकशी केली. राजकीय व पोलिसांसोबतचे हितसंबध वापरून या प्रकरणात सेटलमेंट केली जात असल्याची माहिती आहे. या प्रकरणातील चौकशी थांबावी, यासाठी एका आमदाराच्या भावानं पोलीस ठाण्यातच ठिय्या दिला. त्याने आमदार भावाचे पोलीस तपास अधिकाऱ्यांशी बोलणे करून दिल्याची माहिती आहे.