सेल्समनने शर्ट चोरला होता…पण मालकासह बाऊन्सरने पोलिसांत न जाता जे काही केलं ते धक्कादायकच आहे
नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात जखमी सेल्समनने दिलेल्या फिर्यादीवरुन गंगापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुहूर्त मॉलच्या मालकसह अन्य कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.
नाशिक : नाशिकच्या मुहूर्त मॉलच्या मालक आणि बाऊन्सरने एका सेल्समनला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. यावरून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तरुणांच्या अंगावर मारहाणीचे व्रण असल्याने त्याच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. तरुणाच्या पाठीवर, मांडीवर जबर मार लागला आहे. ठक्कर डोम जवळ असलेल्या मॉलमध्ये ही घटना घडली आहे. दिवाळीच्या काळात दिमाखात सुरू झालेल्या मुहूर्त मॉलमध्ये हा प्रकार घडल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. मुहूर्त मॉलचा मालक रिटेश जैन, विनीत राजपाल यांच्यासह बाऊन्सर अभिषेक सिंग आणि त्याच्या इतर दोन सहकाऱ्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लाखों रुपयांचा माल चोरल्याचा आरोप केलेल्या सेल्समनची पोलिसांकडे तक्रार करण्याऐवजी मॉलमध्ये दोन दिवस छळ केल्याने हा विषय संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.
नाशिकच्या गंगापूर पोलीस ठाण्यात जखमी सेल्समनने दिलेल्या फिर्यादीवरुण गंगापूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मुहूर्त मॉलच्या मालक आणि बाऊन्सरने लाकडी दांडक्याने मारहाण केली आहे, यामध्ये दोन दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असतांनाही पोलीसांनी दोन दिवस उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये सेल्समनला मारहाण करत असतांना त्याच्या आईने वीस हजार रुपयांची रक्कम देऊन मुलाची सोडवणूक केली असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
त्यामुळे अपहरण, खंडणी आणि मारहाणीसह जातीवाचक शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी जखमी सेल्समनच्या भावाने पोलिसांकडे केली आहे.
विशाल सुधाकर वाहुलकर असं जखमी सेल्समनचे नाव आहे. त्याने शर्ट चोरी केल्याचा पुरावा न दाखवता तो शर्ट चोरी करीत असल्याचा आरोप करत त्याला ही बेदम मारहाण झाली आहे.
सेल्समन विशालला एका फ्लॅटवर घेऊन जात तिथे मारहाण करत डांबून ठेवले होते, विशेष म्हणजे आईला फोनलावून ऑडिट सुरू असल्याचे सांगण्यास भाग पाडले होते.
एकूणच कमी काळात नाव कमावलेल्या मुहूर्त मॉलमधील ही घटना संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरला असून मॉलच्या मालकावर कारवाईची मागणी केली जात आहे.