Video : सांगलीचा इषयच हार्ड! आधी CCTV वर काळा स्प्रे मारला, मग ATM मशिनच घेऊन फरार
Sangli Crime News : एटीएम मशीनवरील दरोडा कुणाला कळू नये साठी दरोडेखोरांनी वापरलेली मोड्स ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत.
सांगली : सांगली तालुक्यातील (Sangli Crime) कवठेमहांकाळ इथं एटीएममध्ये चोरी करण्यात आली. यावेळी चक्क एटीएमचं मशिनच (ATM Machine) चोरट्यांनी लांबवलं. ही चोरीची घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV Video) कैद होऊ नये म्हणून आधीच सीसीटीव्हीवर काळा स्प्रे चोरट्यांनी फवारला होता. कवठेमहांकाळ तालुक्यातील शिरढोण इथं शनिवारी मध्यरात्री ही चोरीची घटना घडली. भरवस्तीत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएमवर चोरट्यांनी डल्ला मारला. या एटीएममध्ये 22 लाखापेक्षा अधिक रोकड होती. बोलेरोमधून आलेल्या या चोरट्यांनी कटरने एटीएमचं मशिनच कापलं आणि 22 लाख रुपयांच्या रोकडने खचाखच भरलेलं एटीएम मशिन घेऊनच हे चोरटे पसार झाले. या धाडसी चोरीनं शिरढोणसह संपूर्ण सांगली जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शिरढोण येथील एटीएमवर हा दरोडा टाकण्यात आला.
सीसीटीव्हीवर काळा स्प्रे
एटीएम मशीनवरील दरोडा कुणाला कळू नये साठी दरोडेखोरांनी वापरलेली मोड्स ऑपरेंडी पाहून पोलीसही चक्रावून गेले आहेत. एटीएमच्या चोरीची घटना कळावी, यासाठी चोरांनी एटीएमच्या आतील आणि बाहेरील अशा दोन्ही सीसीटीव्ही कॅमेऱ्यावरच आधी पहिला प्रहार केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर काळा स्प्रे मारुन सीसीटीव्हीला काही दिसणारच नाही, अशी करामत करुन ठेवली. त्यानंतर एटीएममध्ये मध्यरात्री अडीच वाजता चोरटे बोलेरोतून आले आणि त्यांनी एटीएमचं मशिन कटरने कापलं.
कटरने मशिन कापल्यानंतर मशिन गाडीत भरलं आणि चोरटे घटनास्थळावरुन पसारल झाले. रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या शिरढोणमध्ये अर्जुन विठ्ठल निकमांच्या इमारतीमधील गाळ्यात हे एटीएम होतं. बँक ऑफ इंडियाच्या या एटीएमध्ये 22 लाख 34 हजार रुपयांची रोकड होती.
दरोड्याआधी गोळीबार…
धक्कादायक बाब म्हणजे दरोड्यावेळी चोरट्यांनी गोळीबारही केला. दरवाजा बंद केल्यानं निकम या गोळीबारातून थोडक्यात बजावले. चोरी होत असल्याचं पाहून घरमालक असलेल्या निकम यांनी चोरट्यांच्या दिशेने काचेचे ग्लास आणि लाकडी बाग फेकले होते. आरडाओरडाही केला होता. पण गोळीबार करत चोरट्यांनी प्रतिहल्ला केला. यानंतर घाबरुन सगळ्यांनी दारं-खिडक्या बंद केल्या आणि ही संधी साधून चोरट्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.
या धाडसी दरोड्यानंतर आता सांगलीत खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेतला असून अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेण्याचं आव्हान आता पोलिसांसमोर असणार आहे.