सांगली : सांगली जिल्ह्यातील (Sangli Crime News) कवठेमहांकाळ येथील एका तरुणाचा खून झाला आहे. तो तरुण व्हॉट्सॲपवरती (Whatsapp)असं काही पाठवायचा की लोकांना टेन्शन यायचं. त्याचा राग मनात धरुन पाच तरुणांनी एका तरुणाला संपवलं आहे. त्या तरुणाचा मृतदेह म्हैशाळ योजनेच्या बोगद्यातील विहीरीत सापडला आहे. पाच मित्रांनी मिळून खून केला आहे. पोलिसांनी (Sangli police) या प्रकरणातील पाच आरोपींना ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर त्यांची चौकशी देखील पोलिस करीत आहेत. ज्या तरुणाचा मृतदेह सापडला आहे, त्याचे नाव सुशिल सुर्यकांत आठवले असं आहे.
व्हॉट्सॲपवरती अश्लील मेसेज पाठवित असल्याचा राग मनात धरून सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ शहरातील सुशिल सुर्यकांत आठवले या २३ वर्षीय तरुणाचे अपहरण करुन पाच जणांनी खून करून म्हैसाळच्या कालव्यात टाकला होता. मृतदेह स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आणि कवठेमहांकाळ पोलिसांच्या पथकांनी शोधून काढला. सातव्या दिवशी लंगरपेठ गावच्या हद्दीत म्हैशाळ योजनेच्या बोगद्यातील विहीरीत सदरचा मृतदेह सापडला. या खुनप्रकरणी पाच संशयितांना अटक केली आहे.
कवठेमहांकाळ शहरामधील 23 वर्षीय तरुणाला कवठेमहांकाळ येथील जनावरांच्या बाजारातील शेडजवळ लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याला खासगी रुग्णवाहिकेतून काही अंतरावर गेल्यानंतर मारहाण व खून करून मृतदेह लोखंडी पुलावरून म्हैसाळ योजनेच्या कालव्यात टाकला होता. दरम्यान पोलिसांनी कवठेमहांकाळ येथील चैतन्य नामदेव माने, सुनिल मारुती माने या दोघांनी स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पोलिसांसमोर हजर राहत खून केला असल्याची कबूली दिली.
मृतदेहच सापडला नसल्याने पोलिसांना तपास करीत असताना मोठी अडचण निर्माण झाली होती. गुरुवारी मेघा सुर्यकांत आठवले यांनी आपला मुलगा सुशिल हा बेपत्ता झाला असल्याची फिर्याद दिली. मेघा आठवले यांच्या फिर्यादीनंतर या पाच जणांच्या विरोधात खुनाच्या उद्देशाने अपहरण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. चैतन्य नामदेव माने व सुनिल मारुती माने यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलिसांनी कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. तर अनुज अमृत माने, अनिल मारुती माने व ऑल्विन संजय वाघमारे या तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.