महिलेला हिसडा देऊन पळू निघालेल्या चोरट्यांना नागरिकांना पकडलं, नंतर बेदम मारहाण केली, मग…
यावेळी त्यांच्या पुढे असलेल्या एका कार चालकाने आरशात हा सर्व प्रकार बघितला. गाडीतील डाव्या साईडला बसलेल्या तरुणाने गाडीचा दरवाजा उघडला आणि संशयित तिघांची दुचाकी थेट दरवाजाला धडकून ते रस्त्यावर पडले.
सांगली : सांगली शहरातील (sangli city) अतिशय वर्दळीच्या असणाऱ्या कोल्हापूर रस्त्यावर (kolhapur road) दुचाकी घेऊन निघालेल्या महिलेच्या पर्सला हिसडा मारणाऱ्या तिघा दुचाकीस्वारांना नागरीकांनी बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. संशयितांनी महिलेला रस्त्यावरून अक्षरशः फरपटत नेले. भरदिवसा ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. हजारोंच्या जमावाने गर्दी करत तिघांना ताब्यात दिले. त्यातील दोघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. सुरज सत्ताप्पा भोसले, वैभव कृष्णांत पाटील आणि मुनीब मुस्ताक भाटकर अशी त्या तिघांची नावे आहेत. या घटनेत महिला जखमी झाली. दरम्यान, या सर्व घटनेचा थरार सीसीटीव्हीत (CCTV) कॅमेरात कैद झाला आहे.
हरिपूर रोडवर राहणाऱ्या साधना सातपुते या त्यांची मोपेड दुचाकी पंक्चर झाल्याने त्यांच्या मुलीसह गाडी ढकलत कोल्हापूर रोडवरून बस स्थानक परिसराकडे निघाल्या होत्या. यावेळी संशयित तिघे त्यांच्या जवळ आले. त्यांनी मदत करण्याचा बहाणाकरून सातपुते यांच्या हातातील पर्स हिसका मारून पळून घेऊन जाऊ लागले. यावेळी सातपुते यांनी धैर्य दाखवत पर्स सोडली नाही. संशयितांनी त्यांना 200 फूट पुढे फरपटत रस्त्यावरून घेऊन गेले.
यावेळी त्यांच्या पुढे असलेल्या एका कार चालकाने आरशात हा सर्व प्रकार बघितला. गाडीतील डाव्या साईडला बसलेल्या तरुणाने गाडीचा दरवाजा उघडला आणि संशयित तिघांची दुचाकी थेट दरवाजाला धडकून ते रस्त्यावर पडले. परिसरात असलेल्या नागरिकांनी धाव घेत तिघांना बेदम चोप दिला आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्यांची दुचाकी जप्त करून तिघांना ताब्यात घेतले. यावेळी दोघेजण हे पोलिसांच्या रेकॉर्डवरील आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, भर वस्तीत अशी घटना घडल्याने पोलिसांच्या गस्तीवर जमावाने प्रश्न चिन्ह उपस्थित केला. भरवस्तीत चोरीच्या घटनेमुळे हजारोंचा जमाव परिसरात जमला होता. अक्षरशः अर्धा तास नागरीकांनी संशयितांना धरून ठेवले होते. पोलिसांना कळवल्यानंतर अर्धा तासाने पोलिसांनी इंट्री मारली.