स्वस्तात सोने खरेदी करण्याची हौस महागात पडली, दोन महिलांकडून लाखोचा गंडा
स्वस्तात सोने मिळत असल्याने व्यापाऱ्याला हाव सुटली. पैसे घेऊन सोनं खरेदी करायला गेला मात्र सोने तर मिळाले नाहीच. पण लाखो रुपये गमावून आला.
सांगली : स्वस्तात सोनं खरेदी करण्याची हौस एका व्यापाऱ्याला चांगलीच महागात पडली आहे. दोन महिलांनी व्यापाऱ्याला 25 लाख रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी दोन महिलांसह चौघांनी पुणे-बंगलोर महामार्गावरील आणेवाडी पथकर नाक्यावर अटक करण्यात आली आहे. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने ही कारवाई केली आहे. त्यांच्याकडून लुटीतील साडे बारा लाख हस्तगत करण्यात आले आहेत. प्रशांत निंबाळकर, प्रवीण खिराडे, मानसी शिंदे आणि नम्रता शिंदे अशी अटक आरोपींची नावे आहेत. चौघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. लुटीतील उर्वरीत रक्कम हस्तगत करण्याचे आणि टोळीतील अन्य संशयितांना पकडण्याचे पोलिसांचे प्रयत्न सुरु आहेत.
व्यापाऱ्याकडून पैसे घेत पोलीस आल्याची बातवणी करत फरार
स्वस्तात सोने देतो असे सांगून पुण्यातील व्यापारी मयूर जैन यांना मंगळवारी सांगलीतील फळमार्केट जवळ आरोपींनी बोलावले. यावेळी आरोपी अशोक रेड्डी याच्यासह त्याच्या टोळीने सोन्याचे बिस्किट दाखवून जौन यांचा विश्वास संपादन केला. व्यापाऱ्याकडून 25 लाख रुपये घेतले, मात्र सोने न देता पोलीस आल्याचे सांगत पोबारा केला. यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच जैन यांनी पोलिसात धाव घेतली. सांगली पोलिसांनी तातडीने सातारा पोलिसांना कळवण्यात आले.
संशयित पुण्याच्या दिशेने जात असल्याचे कळताच भुईंज पोलिसांनी आणेवाडी येथे नाकाबंदी केली. यावेळी एका संशयित जीपला अडवून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन झडती घेतली. यावेळी लुटीतील साडेबारा लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले. आरोपींनी आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे याबाबत पोलीस सखोल चौकशी करत आहेत.