Ulhasnagar Crime : उल्हासनगरमधील त्या दाम्पत्याच्या मृत्यूचे सातारा कनेक्शन, ‘या’ कारणातून संपवले जीवन
उल्हासनगरमध्ये काल एक धक्कादायक घटना घडली. दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सचिव नंदकुमार ननावरे यांनी पत्नीसह टोकाचे पाऊल उचलले. याप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे.
उल्हासनगर / 2 ऑगस्ट 2023 : उल्हासनगरमधील ननावरे दाम्पत्याच्या मृत्यू प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. दिवंगत माजी आमदार ज्योती कलानी यांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार ननावरे आणि त्यांच्या पत्नीने काल राहत्या बंगल्याच्या गच्चीवरुन उडी घेत जीवन संपवले. ननावरे दाम्पत्याने टोकाचे पाऊल का उचलले याबाबत अनेक तर्कवितर्क लढवण्यात येत होते. मात्र त्यांच्या मृत्यूचे कारण आता समोर आले आहे. ननावरे दाम्पत्याच्या मृत्यूचे सातारा कनेक्शन समोर आलं आहे. साताऱ्यातील एका व्यक्तीच्या धमक्यांना कंटाळून ननावरे दाम्पत्याने टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याच्या धमकीमुळे जीवन संपवले
ननावरे यांनी मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. या व्हिडिओत त्यांनी सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील संग्राम निकाळजे या वक्तीच्या त्रासाला कंटाळून टोकाचे पाऊल उचलत असल्याचे म्हटले आहे. ननावरे यांनी उडी घेण्यापूर्वी हा व्हिडिओ पोलीस वरिष्ठ दलातील अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांना पाठवला होता. तसेच ननावरे यांच्या खिशातही एक चिट्ठी सापडली आहे. या चिट्ठीत देखील संग्राम निकाळजे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी खोट्या प्रकरणात अडकवण्याची धमकी दिल्याने आपण पत्नीसह हे टोकाचे पाऊल उचलल्याचे म्हटले आहे.
पोलिसांकडून सखोल तपास सुरु
ननावरे हे देखील मूळचे फलटण तालुक्यातील आहेत. ननावरे आणि मुख्य आरोपी निकाळजे यांच्यात काही वाद होते का? की कुणाच्या सांगण्यावरुन तो ननावरे यांना धमकी देत होता, याबाबत पोलीस सखोल तपास करत आहेत. ननावरे यांचा व्हिडिओ आणि सुसाईड नोट याच्या आधारे विठ्ठलवाडी पोलिसांनी याप्रकरणी संग्राम निकाळजे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.