शाळेत विद्यार्थ्यांमध्ये भांडण, छातीवर उड्या मारल्याने दुसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
मुलाच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी शाळा प्रशासनाला जबाबदार धरले आहे. शाळेकडून झालेल्या दुर्लक्षपणामुळे शाळेत ही दुर्घटना घडल्याचे मुलाच्या पालकांनी म्हटले आहे.
फिरोजाबाद : प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या भांडणात एका दुसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये घडली आहे. किशनपूर गावातील प्राथमिक शाळेत 7 वर्षाचा शिवम दुसरी इयत्तेत शिकत होता. सोमवारी शाळेत त्याचे इतर विद्यार्थ्यांसोबत भांडण झाले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी त्याच्या छातीवर उड्या मारल्या. यानंतर मुलाची तब्येत बिघडल्याने त्याला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला.
नातेवाईकांचा शाळा प्रशासनावर दुर्लक्षपणाचा आरोप
मुलाच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी शाळा प्रशासनाला जबाबदार धरले आहे. शाळेकडून झालेल्या दुर्लक्षपणामुळे शाळेत ही दुर्घटना घडल्याचे मुलाच्या पालकांनी म्हटले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
शवविच्छेदन अहवालानंतर पुढील कारवाई
शवविच्छेदन अहवाल, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे जबाब नोंदवल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले. सध्या मुलाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
मुख्याध्यापकांकडून घटनेबाबत हात वर
शाळेच्या मुख्याध्यापकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी साडे तीन वाजता शाळा सुटली. तोपर्यंत अशी कुठलीही घटना घडली नव्हती. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये भांडण झाले असेल, ज्याबद्दल आमच्याकडे माहिती नाही.
पोलिसांनी शाळेची पाहणी करत मयत विद्यार्थ्याच्या नातेवाईकांची भेट घेतली. शवविच्छेदन अहवालात शालेय स्तरावर कुणी दोषी आढळल्यास त्याच्याविरोधात कारवाई केली जाईल, असे डिओंनी सांगितले.
साडी परिधान करत दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या
अज्ञात कारणातून दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने साडी परिधान करत आणि श्रृंगार करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पश्चिम बंगालमधील सिलीगुडी येथे घडली आहे. या घटनेने पोलीसही चक्रावले आहेत. विद्यार्थ्याने असे कृत्य नेमके का केले याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.