महाशिवरात्रीचा प्रसाद घेण्यासाठी थांबलेल्या नागरिकांना कारची धडक, सात जण जखमी
आज महाशिवत्री असल्याने जागोजागी महाप्रसाद वाटप सुरू आहे. मोहाडी शहारातील महादेव मंदिरात सुध्दा महाप्रसाद वाटप सुरु होतं. यामुळे भाविक मोठ्या संख्येने महाप्रसाद घेण्यासाठी आले होते.
भंडारा / तेजस मोहतुरे (प्रतिनिधी) : महाशिवरात्रीनिमित्त महाप्रसाद घेण्यासाठी थांबलेल्या भाविकांना भरधाव कारने चिरडल्याची खळबळजनक घटना भंडाऱ्यातील मोहाडी येथे घडली आहे. या घटनेत सात भाविक जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ही घटना घडली. जखमींवर मोहाडी ग्रामीण रूग्णालयात उपचार सुरू आहेत. वॅगनरमधील चालकाला पकडून स्थानिकांनी चांगलाच चोप दिला. त्यानंतर त्याला मोहाडी पोलिसांच्या स्वाधीन केले. मोहाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी अपघाताची नोंद करण्यात आली आहे. महेंद्र डेकाटे, पिंटू पारधी, पंकज कटकवार, शिव चिंधालोरे, हिरालाल थोटे अशी अपघातात जखमी झालेल्या भाविकांची नावे आहेत.
महाशिवरात्रीनिमित्त महादेव मंदिरात सुरु होते महाप्रसाद वाटप
आज महाशिवत्री असल्याने जागोजागी महाप्रसाद वाटप सुरू आहे. मोहाडी शहारातील महादेव मंदिरात सुध्दा महाप्रसाद वाटप सुरु होतं. यामुळे भाविक मोठ्या संख्येने महाप्रसाद घेण्यासाठी आले होते. याच दरम्यान भंडाऱ्याकडून तुमसरच्या दिशेने जाणारी वॅगनर गाडी अनियंत्रित होऊन महाप्रसाद घेत असलेल्या नागरिकांना जोरदार धडकली.
अपघातात सात भाविक जखमी
या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. या अपघातात सात भाविक जखमी झाले. यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना मोहाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेनंतर संतापलेल्या जमावाने कारचालकाला चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले.
साताऱ्यात वाहनावरील ताबा सुटल्याने कार दुकानात घुसली
सातारा जिल्ह्यात कोरेगाव तालुक्यातील धामणेर गावानजीक साताऱ्याहून रहिमतपूरच्या दिशेने निघालेल्या व्हॅगनार कारमधील चालकाचा ताबा सुटल्याने कार थेट दुकानात घुसली. धामणेर येथील रानमळा स्नॅक्स सेंटरमध्ये गाडी घुसल्याने स्नॅक्स सेंटरचे मोठे नुकसान झाले. या अपघातात वाहन चालक गंभीर जखमी झाला असून, त्यास उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.