Sharad Mohol Murder | शरद मोहोळ हत्याप्रकरणी आणखी तिघांना अटक, हत्येच्या सरावावेळी तिघे हजर;
Sharad Mohol Murder : कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणाने पुणं हादरलं. या प्रकरणी रोज नवे खुलासे होतात. आता याप्रकरणात मोठे अपडेट्स समोर आले आहेत. या हत्या प्रकरणी पुणे पोलिसांनी आणखी तीन आरोपींना अटक केली असून आरोपींची संख्या 13 वर गेली आहे.
अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे | 13 जानेवारी 2024 : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणी मोठे माहिती समोर आली आहे. या हत्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून आणखी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून आता अटकेतील आरोपींची संख्या 13 वर पोहोचली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाकडून काल रात्री 3 आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या. आदित्य गोळे, नितीन खैरे या दोघांसह आणखीन एका आरोपीला मोहोळ हत्या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
नितीन आणि आदित्य या दोन आरोपींनी शरद मोहोळ हत्याप्रकरणीत मुख्य आरोपीला पैसे पुरवल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. एवढंच नव्हे तर शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर हा गोळीबाराचा सराव करताना हे तीनही आरोपी घटनास्थळावर उपस्थित होते, असेही समोर आले आहे. काल पकडण्यात आलेले तीनही आरोपी शरद मोहोळ हत्या प्रकरणात सहभागी होते.
लग्नाच्या वाढदिवशी काढला काटा
शुक्रवार,५ जानेवारीला शरद मोहोळ याची त्याच्याच घराजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यामध्ये दोन वकिलांसह आठ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आणखी आरोपींना ताब्यात घेण्यात आलं. याप्रकरणी पोलिस कसून तपास करत आहेत. त्याच दरम्यान पुणे पोलिसांनी आता आणखी तीन जणांना अटक केली आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा पथकाने काल आणखी तिघांना ताब्यात घेतलं.
आरोपींची वकिलांसोबत झाली होती मीटिंग
शरद मोहोळ हत्या प्रकरणात दोन वकिलांनाही अटक करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात ज्या आरोपींना अटक करण्यात आली आहे, त्यांची या वकिलांसोबत आधीच “मीटिंग” झाली होती. हत्येचा हा कट बऱ्याच काळापासून शिजत होता. मिळालेल्या माहितीनुसार, ५ जानेवारीला , त्याच्या लग्नाच्या वाढदिवशीच शरदची हत्या झाली. पण तो काही त्याच्या हत्येचा पहिलाच प्रयत्न नव्हता. यापूर्वीही आरोपींनी दोन ते तीन वेळा शरद मोहोळ याला एकटं पाडून मारण्याचा प्रयत्न केला होता. एवढंच नव्हे तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र तो अयशस्वी ठरला.
मोहोळला कसा संपवला ?
दरम्यान, शरद मोहोळ याची 5 जानेवारी 2024 ला दुपारी दीडच्या सुमारास हत्या झाली. मोहोळचा साथीदार मुन्ना पोळेकर याने त्याच्यावर पाठीमागून गोळीबार केला होता. आधीच आपले दोन साथीदार त्याने बाहेर ठेवले होते. मोहोळसोबत बाहेर पडताच त्याने पहिली गोळी चालवली त्यानंतर त्याच्या साथीदारांनी गोळ्या मारत मोहोळ याला जागीच ठार केलं. पुण्यात या हत्येमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती, आरोपींना पोलिसांनी त्याच रात्री शिरवळदरम्यान पकडत अटक केली होती.
मोहोळला संपवण्यासाठी नाही म्हणून..
शरद मोहोळ याला संपवण्यासाठी मदत करत नाही म्हणून मामा-भाचांनी मुळशीतील भूगावमधील एकावर गोळीबार केला होता, अशी धक्कादायक माहिती नुकतीच उघड झाली. साहिल पोळेकर आणि नामदेव कानगुडे यांनी 17 डिसेंबरला गोळ्या झाडून एकाची हत्या केली. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ऑक्टोबरमध्येही शरद मोहोळ याला मारण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो यशस्वी झाला नाही. भूगावमधील नेमक्या कोणावर नामदेव कानगुडे आणि साहिल पोळेकर यांनी गोळीबार केला गेला त्याचं याचं नाव अद्याप समोर आलेलं नाही.