Sharad Mohol Murder | शरद मोहोळला संपवण्यासाठी पैसा कोणी पुरवला? मुळशीतूनच नावांसह मोठी माहिती समोर
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. शरद मोहोळ याला संपवण्यासाठी कोणी पैसा लावला? आता या आरोपांची नावं समोर आली आहेत. हे तिघे आरोपी मुळशीमधीलच आहेत.
अभिजीत पोते, पुणे : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. शरद मोहोळ याला अनेकवेळा संपवण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र आरोपींना याआधी काही यश मिळालं नाही, मात्र मुन्ना पोळेकरला मोहोळच्या टोळीमध्ये पेरत चांगलाच ट्रॅक लावलेला. शरद मोहोळ प्रकरणातील नामदेव कानगुडे आणि मुन्ना पोळेकर यांच्या व्यतिरिक्त आणखी मास्टरमाईंड आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. अशातच मोहोळला संपवण्यासाठी ज्यांनी पैसा लावला त्यांची नावं समोर आली आहेत.
शरद मोहोळला संपवायला कोणी लावला पैसा?
शरद मोहोळ याला संपवण्यासाठी मुळशातीलच तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. या तिन्ही आरोपींनी शरद मोहोळला संपवणारा मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याला पैसे दिल्याचं तपासामध्ये उघड झालं आहे. या तिन्ही आरोपींना रात्री पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून त्याची चौकशी केल्यावर आणखी काही माहिती समोर येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आदित्य गोळे, नितीन खैरे याच्यासह आणखी एका पोलिसांनी पकडलं आहे. इतकंच नाहीतर मुन्ना पोळेकर याने ज्या ठिकाणी पिस्तुल चालवण्याचा सराव केल्या त्या ठिकाणी हे आरोपी उपस्थित असल्याची माहिती समजत आहे. साहिल उर्फ मुन्ना पोळेकर आणि त्याचा मामा नामदेव कानगुडे यांनी 17 डिसेंबरला भूगावमध्ये एकावर गोळीबार केला होता. याचं कारण म्हणजे त्याने शरद मोहोळ याला संपवण्यासाठी मदत केली नाही म्हणून त्याच्यावर हल्ला केला. याप्रकरणी बंड गार्डन येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, आतापर्यंत या प्रकरणामध्ये एकूण 13 आरोपींना अटक करण्यात आली आहे. शरद मोहोळ खून प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या खून प्रकरणात आणखी कितीजण सामील आहेत, तसेच मुख्य सूत्रधार कोण आहे, यादृष्टीने गुन्हे शाखेकडून तपास करण्यात येणार आहे. याप्रकरणी साहील उर्फ मुन्ना पोळेकर, नामदेव कानगुडे, अमित उर्फ अमर कानगुडे, चंद्रकांत शेळके, विनायक गव्हाणकर, विठ्ठल गांदले, अॅड. रवींद्र पवार, अॅड. संजय उडान यांना अटक करण्यात आली आहे.