सांगलीत कॅफे शॉपमध्ये गुंगीचं औषध देऊन तरुणीवर बलात्कार? शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान आक्रमक
"येत्या दोन दिवसात कॅफे शॉपवर कारवाई करा. अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू. प्रसंगी सांगली बंद करू", असा मोठा इशारा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्ताने दिला आहे.
“सांगली शहरासह जिल्ह्यातल्या कॅफे शॉपवर येत्या दोन दिवसात कारवाई करा. अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरू आणि प्रसंगी सांगली बंद करू”, असा मोठा इशारा शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे अध्यक्ष नितीन चौगुले यांनी सांगली पोलिसांनी दिला आहे. शहरातील कॅफे शॉपमध्ये अश्लील चाळे सुरू असल्याचा आरोप शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या अध्यक्षांनी केला आहे. कॅफे शॉपमध्ये कथित सुरु असलेल्या अश्लील गोष्टींमुळे शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या कार्यकर्त्यांनी तीन कॅफे शॉपची तोडफोड केली आहे.
सांगली शहरातील एका मुलीला कॅफे शॉपमध्ये गुंगीचं औषध देऊन बलात्कार सारखा धक्कादायक प्रकार घडला आहे. त्यामुळे संतप्त भावनेतून शहरातील 3 कॅफे शॉपची तोडफोड कार्यकर्त्यांनी केल्याचंही नितीन चौगुले यांनी स्पष्ट केलं आहे. यापुढील काळात जर कारवाई होणार नसेल तर कॅफे शॉप विरोधातील आंदोलन राज्यभर उभे करू, असा इशारा देखील शिवप्रतिष्ठान युवाच्या वतीने नितीन चौगुले यांनी दिला आहे.
तोडफोड प्रकरणी पोलिसांकडून कारवाई
दरम्यान, शहरातल्या तीन कॅफे शॉपच्या तोडफोड प्रकरणी पोलिसांकडून 16 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक रितू खोकर दिली आहे. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या अध्यक्षांकडून कॅफेबाबत करण्यात आलेले आरोप कितपत खरे आहेत? याचादेखील तपास होणं अपेक्षित आहे. पोलीस या प्रकरणाच्या खोलवर जातात का? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.