शिवसेना नेत्याची हत्या करणाऱ्याच्या कारमध्ये मिळाला या कॉमेडियनचा फोटो…
पंजाबमधील शिवसेनेचे नेते सुधीर सुरी यांची हत्या करणाऱ्यांच्या कारमध्ये कॉमेडियनचा फोटो सापडला आहे.
नवी दिल्लीः अमृतसरमधील शिवसेना नेते सुधीर सुरी यांच्या हत्येचा तपास करणार्या पोलिसांना आरोपी संदीप सिंगच्या वाहनातून एक फाईल सापडली आहे. त्यामध्ये कॉमेडियन भारती सिंह आणि अँटी टेररिस्ट फ्रंटचे अध्यक्ष मनिंदर जीत सिंह बिट्टा यांचाही फोटो सापडला आहे. सुधीर सुरी यांच्यावर हल्ला करणारे हल्लेखोर हे कारमधून आले होते. सुरी यांच्यावर हल्ल्या केल्यानंतर तो कारमधून पळून जात होता. त्यावेळी जमावाने त्याच्या गाडीवरही जोरदार दगडफेक केली आहे.
अमृतपाल सिंग यांचेही छायाचित्र असल्याचे पोलिसांना आढळून आले आहेत. अमृतपाल हा जर्नेलसिंग भिंद्रनवालेचा समर्थक आहे. तो खलिस्तानी समर्थक असल्याचेही सांगितले जात आहे.
पोलिसांनी कार ताब्यात घेऊन तपास सुरू केला असून कारमधून सापडलेल्या फोटो संदर्भातही तपास कार्य सुरू केले आहे. तर ज्यांच्यावर गोळी झाडण्यात आली आहे ते सुधीर सुरी हे शिवसेना हिंदुस्थानचे प्रमुख होते.
पोलिसांनी सांगितले की, सुधीर सुरी गोपाल मंदिराबाहेर कचऱ्यात सापडलेल्या मूर्तींच्या निषेधार्थ मंदिराबाहेर आंदोलनास बसले होते.
दुपारी साडेतीनच्या सुमारास संदीप सिंगने गर्दीचा फायदा उठवत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यानंतर काही वेळातच हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे.
आरोपींनी परवानाधारक शस्त्राने शिवसेना नेत्यावर गोळीबार केल्याचेही पोलिसांनी सांगितले आहे. हल्ला करताना त्यांच्यावर पाच गोळ्या झाडल्या असून त्यातच सुधीर सुरी यांचा जीव गेल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
हल्लेखोरांच्या कारमध्ये ज्या व्यक्तींचा फोटो सापडले आहेत. त्याचाही शोध आता पोलीस घेत आहेत. त्यामुळे या प्रकरणाचा आणि त्या व्यक्तींचा काय संबंध आहे का, आरोपींनी भारतीचा फोटो आपल्या कारमध्ये का ठेवला आहे त्याचा ही शोध पोलीस घेत आहेत.