शिवसेना नेते अशोक धोडींचा दृश्यम स्टाईल मर्डर?, कार थेट खदानीत… पालघरच्या नेत्याबाबत गुजरातमध्ये काय घडलं?
सोमवारी 20 जानेवारी 2025 पासून अशोक धोडी हे गायब होते. आता तब्बल ११ दिवसांनी त्यांचा मृतदेह सापडला आहे.

Ashok Dhodi Kidnapping Case : पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते अशोक धोडी यांची हत्या करण्यात आली आहे. अशोक धोडी हे सोमवारी 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. अशोक धोडी यांच्या अपहरणामुळे राज्यभरात खळबळ उडाली होती. पोलिसांकडून त्यांचा सातत्याने शोध घेतला जात होता. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या 12 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा मृतदेह आढळला आहे. त्यांच्या गाडीच्या डिकीत त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.
अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणाचा तपास पोलिसांकडून सुरु होता. या प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली होती. यावेळी चौकशीदरम्यान पोलिसांना त्यांच्या कारची माहिती मिळाली. यानुसार गुजरातमधील भिलाडजवळ असलेल्या सरिग्राम मालाफलिया येथे एका बंद दगड खाणीत त्यांची कार असल्याचे समोर आले होते. यानंतर गेल्या दोन ते तीन तासांपासून या खाणीत शोधकार्य सुरु होते. ही कार बाहेर काढण्याआधी गोताखोरांनी एक काळ्या रंगाचे जॅकेट आणि सफेद रंगाचा हेडफोन मिळाला होता.
यानंतर पाण्याची खोली जास्त असल्याने कार काढण्यामध्ये मोठ्या अडचणी आल्याचेही बघायला मिळाले आहे. गोताखोरांच्या मदतीने बंद पडलेल्या खाणीतून कार काढण्यात आली आहे. या कारच्या डिकीत अशोक धोडी यांचा मृतदेह सापडला आहे. दृश्यम सिनेमातील दृश्याप्रमाणेच हा प्रकार घडला आहे. तब्बल अडीच तासानंतर ही कार पाण्यातून काढण्यात आली.
अशोक धोडी 20 जानेवारीपासून बेपत्ता
अशोक धोडी हे 20 जानेवारीपासून बेपत्ता होते. याप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. धोडी यांचा शोध घेण्यासाठी आठ टीम तयार करण्यात आल्या होत्या. आरोपींनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी गुजरातच्या भिलाडमध्ये जाऊन धोडी यांचा शोध घेतला. एका बंद खदानीत धोडी यांची कार असल्याचं दिसून आलं. त्यामुळे पोलिसांनी गोताखोर आणि क्रेनच्या सहाय्याने संपूर्ण कारचा शोध घेतला. त्यावेळी पाण्यात कार असल्याचं दिसून आलं. ही कार क्रेनच्या सहाय्याने तात्काळ बाहेर काढण्यात आली. यावेळी कारची तपासणी केली असता कारच्या डिक्कीत धोडी यांचा मृतदेह आढळून आला.
सध्या पालघर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील स्वतः याप्रकरणाचा तपास करत आहेत. विशेष म्हणजे कारमधील मृतदेह नेमका कोणाचा आहे, त्यांचाच आहे का, याचा तपास केला जात आहे. या घटनेनंतर सध्या पालघरमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
भाऊ अविनाश धोडी फरार
अशोक धोडी यांच्या हत्येमागे त्यांचा भाऊ किंवा कुटुंबातील जवळच्या व्यक्तींचा सहभाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या काही वर्षापासून अशोक धोडी आणि त्यांचा भाऊ अविनाश धोडी यांच्यात संपत्तीबाबत वाद सुरू आहे. वैयक्तिक वैमनस्यातून भावाने अन्य आरोपींसोबत मिळून हे कृत्य केले असावं, असा अंदाज वर्तवला जात आहे. तसेच काही दिवसांपूर्वी अविनाश धोडी याला पोलिसांनी तपासासाठी बोलवले होते. पोलीस तपास सुरु असतानाचा बहाणा काढून तो फरार झाला.