Yashwant Jadhav | यशवंत जाधवांना मोठा झटका, 40 मालमत्ता आयकर विभागाकडून जप्त, कोणकोणते फ्लॅट्स किती किमतीचे?
यशवंत जाधव यांचा वांद्रे भागातील पाच कोटी रुपयांचा फ्लॅटही आयकर विभागाकडून तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. याशिवाय शहरातील विविध भागात चाळीस मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे
मुंबई : मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव (Yashwant Jadhav) यांना मोठा झटका बसला आहे. यशवंत जाधव यांच्या 40 मालमत्ता आयकर विभागाकडून (Income Tax) तात्पुरत्या स्वरुपात जप्त करण्यात आल्या आहेत. याशिवाय जाधव यांचा वांद्रे भागातील पाच कोटी रुपयांचा फ्लॅटही जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 40 मालमत्तांमध्ये भायखळ्यातील 26 फ्लॅट्सचा समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. यशवंत जाधव यांच्या मालकीच्या काही मालमत्ता नातेवाईकांच्या माध्यमातून चालवल्या जात होत्या, त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. यशवंत यांचे पुतणे विनित जाधव आणि मेहुणे मोहिते यांनाही समन्स पाठवण्यात आल्याची माहिती आहे. आधी यशवंत जाधव यांच्याकडे सापडलेल्या डायरीत ‘मातोश्री’ला दोन कोटी रुपये रोकड आणि 50 लाख रुपये किमतीचे घड्याळ दिल्याचा उल्लेख होता, तर त्यानंतर ‘केबलमॅन’ आणि ‘एम ताई’ अशा दोन व्यक्तींसोबत एक कोटी 75 लाख रुपयांचे व्यवहार झाल्याचंही समोर आलं होतं. आता मालमत्तांच्या जप्तीनंतर जाधवांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिका निवडणुकांच्या तोंडावर जाधव दाम्पत्यासाठी हा धक्का मानला जात आहे.
कोणत्या वर्षी किती मालमत्ता खरेदी?
वर्ष – मालमत्तांची संख्या 2021 – 24 2020 – 07
यशवंत जाधव यांच्या मालमत्ता आणि किंमत
वॉटर फील्ड, क्रॉस रोड IV, वांद्रे – 5 कोटी 10 लाख रुपये बिलखाडी चेंबर्स, माझगाव – 2 कोटी रुपये वाडी बंदर, माझगाव – 5 कोटी 10 लाख रुपये व्हिक्टोरिया गार्डन – 2 कोटी 10 लाख रुपये
यशवंत जाधवांच्या डायरीत काय होतं?
यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात एक डायरी मिळाली होती. यात त्यांच्या व्यवहारांची पोलखोल झाली होती. त्यात निवासी इमारतीतील भाडेकरु हक्क संपादन करण्यासाठी सुमारे 10 कोटी रोख दिले, गुढीपाडव्याला ‘मातोश्री’ला 2 कोटींचे पेमेंट केले, ‘मातोश्री’ला 50 लाखांचे घड्याळ पाठवले, असे उल्लेख होते. याबाबत आयकर विभागाने जाधवांकडे चौकशी केली असता त्यांनी डायरीतील ‘मातोश्री’ म्हणजे आपली आई असल्याचे सांगितले होते. आपल्याला दानाची 2 कोटी रुपयांची रक्कम मिळाली होती. याचा वापर आपण हिंदू नववर्ष – गुढीपाडव्याच्या दिवशी भेटवस्तू देण्यासाठी केला. माझ्या आईच्या नावावर घड्याळांचे वाटप केल्याचा दावा त्यांनी केला होता, पण मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खासगी निवासस्थानाचे नावही ‘मातोश्री’ असल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
31 फ्लॅटची खरेदी, हवालातून दिले पैसे
यशवंत जाधव यांनी न्यूजहॉक मल्टीमीडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून भायखळ्यातल्या बिलखाडी चेंबर्समध्ये 31 फ्लॅट खेरदी केल्याचा आरोप केला जात आहे. इमारतीच्या चार ते पाच भाडेकरूंना 30 ते 35 लाख रुपये दिल्याचा बोललं जातं. हवालाच्या माध्यमातून हे पैसे दिल्याचा संशय आहे. त्याचवेळी आयकर विभागाने इतर 40 मालमत्तांचा तपास सुरु करत अखेर जप्तीची कारवाई केली आहे.
गेल्या महिन्यात यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापे टाकल्यानंतर चार दिवस त्यांची चौकशी सुरु होती. जाधव आणि त्यांची पत्नी – भायखळ्याच्या शिवसेना आमदार यामिनी जाधव यांनी शंभर कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे.
संबंधित बातम्या :
Yashwant Jadhav यांच्याकडून ‘मातोश्री’ला 2 कोटी? जाधव म्हणतात, ती तर माझी आई!
मॅरेथॉन तपासाचा लाँग वीकेंड, यशवंत जाधव यांची इन्कम टॅक्स चौकशी चौथ्या दिवशी संपली