शिवसेना आमदार संजय गायकवाड यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न
संजय गायकवाड यांच्या घरासमोर उभी असलेली गाडी जाळण्याचा आणि घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला (Sanjay Gaikwad Car on Fire)
बुलडाणा : विविध वक्तव्यांमुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणारे बुलडाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड (Shivsena MLA Sanjay Gaikwad) यांची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला. गायकवाड यांची इनोव्हा कार पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला आहे. (Shivsena MLA Sanjay Gaikwad attempt to set Car on Fire)
घरासमोरील इनोव्हा पेटवली
संजय गायकवाड यांच्या घरासमोर उभी असलेली गाडी जाळण्याचा आणि घरावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. मंगळवारी मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली. आमदार संजय गायकवाड हे मुंबईला गेले होते. रात्री दीड वाजता ते घरी परत आले. त्यानंतर दोन अज्ञात व्यक्तींनी दुचाकीवर येऊन वाहनाच्या इंधन टाकीवर पेट्रोल टाकून इनोव्हा गाडी पेटवून दिली.
परिसरातील विद्युत पुरवठाही हल्लेखोरांनी तोडला
इनोव्हाच्या पुढे मागे 4 ते 5 गाड्या उभ्या होत्या, एक गाडी पेटली असती, तर ती सर्व वाहने पेटली जातील आणि घरही आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून गायकवाड परिवाराला इजा पोहोचेल, या उद्देशाने हा हल्ला केल्या गेल्याचा आरोप होत आहे. दरम्यान हा हल्ला करताना परिसरातील विद्युत पुरवठाही हल्लेखोरांनी तोडला होता, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिस अधीक्षकांकडून गंभीर दखल
या घटनेच्या चौकशीसाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक बुधवारी सकाळी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी हल्लेखोरांचा शोध सुरु केला आहे. या प्रकरणी संजय गायकवाड यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी संपर्क साधला असून ही घटना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी ही गांभीर्याने घेतली आहे.
गायकवाडांच्या वक्तव्यांची चर्चा
नागरिकांनी रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी जास्तीत जास्त मांसाहार सेवन करावा, असं बुलडाणा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड म्हणाले होते. मात्र या वक्तव्यावरुन ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची दिलगिरीही गायकवाडांनी व्यक्त केली. ज्यांची मनं दुखावली, त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे. मात्र, ज्यांनी या विषयाचं राजकारण केलं, त्यांची माफी मागणार नाही, असं संजय गायकवाड म्हणाले होते.
संबंधित बातम्या :
(Sanjay Gaikwad Car on Fire)