रिसॉर्ट तोडायला लागले तब्बल 16 तास, पहाटे साडे तीन वाजता मोहीम फत्ते, कुटुंबीयांचा हंबरडा; शिवसैनिकाच्या मृत्यूनंतर मोठी कारवाई
महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच १५ ते १६ तासांहून जास्त वेळ ही तोडक कारवाई सुरु होती. या कारवाईनंतर हे रिसॉर्ट पूर्णपणे भुईसपाट करण्यात आले आहे.
Milind More Death : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ठाण्याचे उपशहर प्रमुख मिलिंद मोरे यांचे अकस्मात निधन झाले. विरारच्या सेव्हन सी बीच रिसॉर्ट या ठिकाणी उभे असताना ते अचानक कोसळले. यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यापूर्वी मिलिंद मोरे यांना जमावाकडून मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणानंतर आता विरारच्या सेव्हन सी बीच रिसॉर्टवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. तब्बल १६ तास ही कारवाई सुरु होती.
मिलिंद मोरे यांच्या मृत्यूनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गंभीर दखल घेतली होती. एकनाथ शिंदे यांनी पोलिसांशी चर्चा केली करुन योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. आता विरारच्या अनधिकृत असलेल्या सेवन सी रिसॉर्टवर कारवाई करण्यात आली आहे. पालिका प्रशासनाने सेवन सी रिसॉर्टवर तोडक कारवाई केली आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच १५ ते १६ तासांहून जास्त वेळ ही तोडक कारवाई सुरु होती. या कारवाईनंतर हे रिसॉर्ट पूर्णपणे भुईसपाट करण्यात आले आहे.
विरारच्या सेव्हन सी बीच रिसॉर्टवर सोमवारी दुपारी 12 वाजल्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी पहाटे 3.30 वाजेपर्यंत ही कारवाई सुरु होती. यावेळी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि महसूल प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते.
नेमकं काय घडलं?
मिलिंद मोरे हे त्यांच्या कुटुंबासोबत विरारच्या अर्नाळा, नवापूर या ठिकाणी असलेल्या सेव्हन सी बीच रिसॉर्ट या ठिकाणी गेले होते. त्यावेळी एका रिक्षाचालकाने त्यांच्या पुतण्याला धक्का दिला. यावरुन बाचाबाची झाली. यानंतर रिक्षाचालकाने गावात जाऊन ही बाब गावकऱ्यांना सांगितली. यानंतर रिक्षाचालक आपल्या साथीदारांना घेऊन रिसॉर्ट जवळ आला. त्याने मिलिंद मोरे आणि त्यांच्या पुतण्यावर हल्ला केला.
यावेळी हल्लेखोरांनी दोघांनाही बेदम मारहाण केली. या मारहाणीत वर्मी घाव बसल्याने मोरे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जागीच कोसळले. यानंतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे त्यांना मृत घोषित केले गेले. मिलिंद मोरे कोसळल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या घटनेनंतर हल्लेखोर पसार झाले आहेत.
कुणालाही अटक नाही
याप्रकरणी नवीन कायद्या भारतीय दंड संहिता 2023 ते कलम 105, 281, 74, 188(1) (2), 191(2), 118(2), 352, 351 (2) प्रमाणे अर्नाळा पोलीस ठाण्यात 7 ते 8 महिला आणि 8 ते 10 अनोळखी पुरुष यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत. यात अद्याप कुणालाही अटक करण्यात आली नाही.