आता विमान प्रवासही असुरक्षित ! फ्लाइटमध्ये महिलेचा विनयभंग, प्रवाशाच्या कृत्याने सर्वच हादरले…
विमान प्रवासादरम्यान एका प्रवाशाने एअर होस्टेसशी गैरवर्तन केल्याची घटना ताजी असतानाच आता पुन्हा अशीच एक धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. विमान हवेत असताना एका इसमाने सहप्रवासी महिलेचा विनयभंग केल्याने सर्वच हादरले. यामुळे आता विमान प्रवासही सुरक्षित नाही का , असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
नवी दिल्ली | 11 सप्टेंबर 2023 : विमान प्रवासादरम्यान (flight journey) प्रवाशांनी केलेल्या गैरवर्तनाच्या अनेक घटना आपल्या कानावर पडत असतात. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून, आता विमान प्रवास सुरक्षित राहिला नाही का ? असाच प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. शनिवारी, मुंबई-गुवाहाटी फ्लाइट दरम्यान एका इसमाने सहप्रवासी महिलेचा (woman molested) विनयभंग केल्याची अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आली असून आरोपीला गुवाहाटी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे, असे एअरलाइन्सतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. शनिवारी रात्री ९ नंतर मुंबईहून टेक-ऑफ केलेल्या 6E-5391 या फ्लाइटमध्ये हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
गेल्या दोन महिन्यांमध्ये विमान हवेत असताना महिलांचा विनयभंग झाल्याची चार प्रकरणे आत्तापर्यंत समोर आली होती. अवघ्या काही दिवसांपूर्वीच मस्कतहून मुंबईला जाणाऱ्या विमानत एका इसमाने एअर होस्टेससोबत गैरवर्तन केले होते. ती घटना ताजी असतानाच शनिवारी पुन्हा हा प्रकार घडल्याचे उघड झाले.
एअरलाइन्स तर्फे देण्यात आलेल्या स्टेटमेंटनुसार, ‘ इंडिगोच्या 6E-5391 या मुंबई-गुवाहाटी फ्लाइटने प्रवास करणाऱ्या एका इसमाला गुवाहाटी येथे उतरल्यानंतर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. विमान प्रवासादरम्यान त्या इसमाने आपल्याशी गैरवर्तन केल्याची तक्रार एका सहप्रवाशाने नोंदवली होती, त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.’ याप्रकरणी तक्रारदार महिलेने एफआयआरही दाखल केली आहे.
तक्रादार महिला ही आयल सीटवर बसली होती. तिने आर्मरेस्ट खाली केला होता आणि केबिनचे दिवे मंद झाल्यावर तिला झोप लागली होती. मात्र शेजारी बसलेल्या व्यक्तीने आर्मरेस्ट वर करून तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, तेवढ्यात तिला जाग आली, असे तिने तिच्या तक्रारीत नमूद केले आहे.
त्याने चुकून स्पर्श केला असेल असं मला वाटलं, आणि मी आर्मरेस्ट पुन्हा खाली केला आणि झोपले. मात्र अवघ्या काही मिनिटांनंतर त्याने तिला पुन्हा चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला. यामुळे ती अतिशय घाबरून गेली होती. तिला ओरडायचं होतं, पण भीतीमुळे तिच्या तोंडून आवाजच बाहेर पडला नाही. मात्र तो इसम पुन्हा तसाच स्पर्श करायला लागल्यावर मात्र तिने त्याचा हात झटकला आणि सीट लाइट्स ऑन करून तिने जोरात हाक मारून केबिन क्रूला बोलावले. तेव्हा त्याने त्याच्या कृत्याबद्दल माफी मागण्यास सुरूवात केली. मात्र त्या महिलेने एफआयआर नोंदवली असून गुवाहाटी येथे त्या इसमाला पोलिसांनी ताब्यात घेतले.