घटस्फोट मिळवण्यासाठी पतीने रचला धक्कादायक कट; गरोदर पत्नीसोबत केले ‘हे’ कृत्य
काहीही करून पत्नीपासून घटस्फोट मिळवायचा, असा निर्धार आरोपी पतीने केला होता. त्या अनुषंगाने तो मागील काही महिन्यांपासून नवनवे प्लान आखत होता.
अमरावती : गर्भवती पत्नीपासून घटस्फोट मिळवण्यासाठी पतीने जे केले पाहून सर्वांच्याच पायाखालची जमिन सरकली. पत्नीला उपचारासाठी रुग्णालयात नेत असल्याचे दाखवून तिला एचआयव्हीबाधित रक्ताचे इंजेक्शन दिले. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. पत्नीची काळजी घेत असल्याचा दिखावा करून पतीने तिचा मोठा विश्वासघात केल्याचे या प्रकरणातून उघडकीस आले आहे. ही घटना आंध्र प्रदेशच्या ताडेपल्ली परिसरातील आहे. या धक्कादायक घटनेने आंध्रप्रदेशसह सर्वांनाच चक्रावून टाकले आहे. आजच्या कलियुगामध्ये दाम्पत्य किती खालच्या थराला जाऊन एकमेकांपासून फारकत घेत आहे, याची प्रचिती या घटनेतून आली आहे.
अन् महिलेच्या पायाखालील वाळू सरकली
काहीही करून पत्नीपासून घटस्फोट मिळवायचा, असा निर्धार आरोपी पतीने केला होता. त्या अनुषंगाने तो मागील काही महिन्यांपासून नवनवे प्लान आखत होता. याच दरम्यान त्याला पत्नीला एचआयव्हीबाधित रक्ताचे इंजेक्शन देण्याची भयानक आयडिया सुचली.
यासाठी डॉक्टरला हाताशी धरण्याचे त्याने ठरवले. त्यानुसार परिसरातील डॉक्टरला पैशांचे आमिष दाखवून प्राणघातक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यामुळे डॉक्टरने आरोपीच्या सुरात सूर मिळवत वेदनाविरहित डिलिव्हरीसाठी विशेष इंजेक्शन देत असल्याचा दिखावा केला.
डॉक्टरच्या सल्ल्यावर भरवसा ठेवत महिलेने इंजेक्शन घेतले. मात्र हे इंजेक्शन बाधित रक्ताचे असल्याचे उघड झाल्यानंतर महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली. तिने तातडीने पोलीस ठाणे गाठून या प्रकाराची रितसर तक्रार दिली आहे.
पतीकडून हुंड्यासाठी छळ; महिलेची तक्रार
पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी एम. चरण याला अटक केली आहे. तो अनेक महिन्यांपासून महिलेचा हुंड्यासाठी छळ करीत होता. या दाम्पत्याला एक मुलगी असून आपल्याला मुलगा व्हावा या कारणावरून देखील तो पत्नीला त्रास देत असे. त्यामुळेच पत्नी गरोदर असतानाही तिची काळजी घेण्यास तो टाळाटाळ करीत होता.
मात्र केवळ घटस्फोट मिळवण्याच्या इराद्याने पत्नीला क्लिनिकमध्ये नेले होते. याचवेळी डॉक्टरला हाताशी धरून पत्नीला बाधित रक्ताचे इंजेक्शन दिले. याबाबत संशय आल्यानंतर महिलेची वैद्यकीय तपासणी केली असता तिच्या रक्ताचा अहवाल एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे आढळले. पीडित महिलेची वैद्यकीय तपासणी केली जाणार असून, पोलीस आरोपींची चौकशी करत आहेत.