बाबा सिद्दीकी यांना गोळ्या घातल्यानंतर शुटर हॉस्पिटलबाहेर अर्धा तास थांबला होता, काय होते कारण?
एनसीपी नेता बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर अनेक बाबी उघडकीस येत आहेत. बाबा सिद्दीकी जर घटनास्थळी आले नसते तर आरोपींचा त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी याला मारण्याचा देखील प्लान होता अशीही माहिती उघडकीस आली आहे.
मुंबईत वांद्रे येथे एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या मुख्य आरोपी शिवकुमार गौतम याला अटक झालेली आहे. या आरोपीने बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये प्रकरणात अनेक गोष्टी पोलिस चौकशीत कबुल केल्या आहेत. आरोपी गौतम याने एनसीपी नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या घातल्यानंतर तो लागलीच फरार झाला नाही. त्यानंतर तो लिलावती रुग्णालयाच्या बाहेर अर्धा तास थांबला होता. या प्रकरणात पोलिसांनी दोघा शुटरना घटनास्थळीच नागरिकांच्या मदतीने पकडले आहे.
एका खाजगी चॅनलच्या बातमीनुसार पोलिसांपुढे आरोपी शिवकुमार गौतम याने अनेक दावे केले आहेत. बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या घातल्यानंतर आपण लागलीच पळालो नाही. तर बाबा सिद्दीकी यांना ज्या लिलावती रुग्णालयात दाखल केले होते. तेथे आपण पोहचलो आणि अर्धा तास वाट पाहीली असे आरोपीने म्हटले आहे.आपल्याला बाबा सिद्दीकी नक्की मेले आहेत की नाही हे जाणून घ्यायचे होते असे आरोपी शिवकुमार गौतम याने म्हटले आहे. पोलिसांनी सांगितले की आरोपीने कोणी आपल्याला ओळखू नये म्हणून टी शर्ट बदलले आणि हॉस्पिटलच्या बाहेरील गर्दीत तो अर्धा तास उभा होता.
काय होता प्लान
जेव्हा आरोपी शिवकुमार गौतम याला समजले की सिद्दीकी यांची स्थिती गंभीर आहे. त्यानंतर तो तेथून निघून गेला. आरोपीने सांगितले की आधीच्या योजनेनुसार तो दोन साथीदार धर्मराज कश्यप आणि गुरमैल सिंह यांना उज्जैन रेल्वे स्थानकावर भेटणार होता. त्यानंतर बिष्णोई गॅंगचे सदस्य त्यांना वैष्णोदेवी घेऊन जाणार होते. परंतू धर्मराज आणि गुरमैल यांना घटनास्थळावरच अटक झाल्याने त्यांचा हा प्लान बारगळला असे म्हटले जात आहे. बाबा सिद्दीकी यांची दसऱ्याच्या दिवशी शनिवारी रात्री (12 ऑक्टोबरला) ९ च्या सुमारास वांद्रे येथील त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी याच्या कार्यालयाजवळ गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती.