श्रद्धा वालकर हत्या प्रकरण : आफताब पुनावालाची पॉलीग्राफ टेस्ट, गुन्ह्याची कबुली दिली पण…
श्रद्धा वालकर हत्या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.
नवी दिल्ली : श्रद्धा हत्येप्रकरणी (Shraddha Walkar Murder Case) दिल्ली पोलिसांचा तपास वेगाने सुरू आहे. याप्रकरणी आरोपी आफताब पूनावालाची (Aftab Poonawala Polygraph Test) पॉलीग्राफ चाचणी करण्यात आली आहे. ही चाचणी करणाऱ्या फॉरेन्सिक अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आफताबने श्रद्धाची हत्या केल्याचं कबुल केलं आहे. तसंच त्याला श्रद्धाची हत्या केल्याचा कोणताही पश्चाताप नसल्याचं त्याने या पॉलिग्राफ टेस्ट दरम्यान सांगितल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
श्रद्धा हत्या प्रकरणात आत्तापर्यंत काय-काय घडलं?
आफताबने सांगितलेल्या ठिकाणी आत्तापर्यंत मृतदेहाची 13 अवशेष मिळाली. जबडाही मिळाला आहे. बाथरूम आणि किचन व्यतिरिक्त सीएफएसएलला बेडरूममधून रक्ताच्या डागांचे नमुनेही मिळाले आहेत. दिल्ली पोलिसांनी काही शस्त्रे जप्त केली आहेत. ही शस्त्रं जंगलात आणि आफताबच्या फ्लॅटमधून मिळाली आहेत. आफताबने या शस्त्राचा वापर कसा केला? हे सीएफएसएलच्या अहवालानंतर कळेल, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
गुरुग्राममधून देखील काही शरीराचे अवशेष मिळाले आहेत.आत्तापर्यंतच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार श्रद्धाला आफताबला सोडायचे होते. त्याच्या छळामुळे ती नाराज होती. या दोघांनी 3-4 मेला वेगळे राहण्याचा निर्णय घेतला होता.
आफताबला ही गोष्ट आवडली नाही. श्रद्धा दुस-या कोणाशी तरी जोडली जाईल, असं त्याला वाटत होतं. फ्लॅट दाखवणाऱ्या बद्रीची कोणतीही भूमिका अद्यापपर्यंत संशयास्पद आढळलेली नाही. त्याने फक्त फ्लॅट दाखवला.
दिल्ली पोलिसांकडे एकही प्रत्यक्षदर्शी नाही. ही या प्रकरणातील सर्वात मोठी समस्या आहे. पोलिसांनी फ्लॅटमधून काही कपडे देखील जप्त केले आहेत. हे CSFL तपासासाठी पाठवले आहेत. CSFL चा अहवाल येणं अद्याप बाकी आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये मुंबई पोलिसांनी आफताबला चौकशीसाठी बोलावले तेव्हा श्रद्धाचे काही अवयव फ्लॅटमध्ये असल्याचा पोलिसांना संशय आहे. आफताबची पॉलीग्राफ टेस्ट झाली आहे. त्यामुळे CSFL तपासात आता कोणत्या बाबी समोर येतात हे पाहणं महत्वाचं असेल.