फक्त ‘हाच’ परिसर चोरीसाठी झाला टार्गेट, महिला-पुरुषांच्या टोळीकडून होणाऱ्या चोरीतही साम्य, दिवसाढवळ्या चोरीच्या घटनेनं खळबळ
पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पोलीसांच्या लेखी नोंद करून घेतली आहे. वारंवार अशा घटना सिन्नर परिसरातच घडत असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
सिन्नर, नाशिक : बंद दाराला कुलूप, मळ्याची वस्ती, शेतकरी कुटुंब आजूबाजूला कुणाची घरं नाही असं चित्र असलं की भर दिवसा चोरी झाली म्हणून समजाच. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील अशा चोरीच्या घटना वारंवार समोर येत आहे. विशेष म्हणजे या चोरीच्या घटना करण्यासाठी पुरुषांसह महिलांचाही समावेश असल्याने नाशिकच्या ग्रामीण पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. मागील आठवड्यापासून चोरट्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला आहे. नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कांद्याची लागवड सुरू असल्याने शेतकरी शेती कामात व्यस्त आहे. तीच संधी पाहून चोरी करणारी टोळी सक्रिय झाली आहे. काही दिवसांपूर्वी याच परिसरात दरोडयाचे सत्र सुरू होते, त्या भीतीच्या वातावरणातून सुटका होत नाही तोच मागील आठवड्यापासून चोरीच्या घटना वाढल्या आहेत.
मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिन्नरच्या खंबाळे येथे बंद घराचे कुलूप तोडून सहा ते सात तोळे सोन्याचे दागिने आणि चार रुपयांची रोकड लंपास केली आहे.
खंबाळे येथून दातली रस्त्याकडे जाणाऱ्या चौफुलीजवळच भागवत आंधळे यांचं घर आहे. या ठिकाणी आंधळे यांच्या इतर भावकीचेही घरं आहे. सध्या शेतीत कांदे लागवड सुरू असल्याने त्यात सर्व व्यस्त होते.
घरापासून शेती साधारणपणे अर्धा -पाऊण किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे दिवसभर घराचे दरवाजे कुलूपबंद असतात, आणि हीच संधी चोरांसाठी महत्वाची ठरली.
आंधळे यांची मुलगी बाळंतपणासाठी माहेरी आलेली होती, ती देखील दुपारच्या वेळी शेतात गेली, त्यामुळे घराला दोन-तीन तास कुलूप लागले होते.
शेतकरी भागवत आंधळे हे देखील बाहेरगावी गेले होते, घरी येताच त्यांना घरात अस्ताव्यस्त कपडे पडलेले दिसले, कुलूपही तुटलेल्या स्थितीत होते हे पाहून त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.
त्यांनी शेतात गेलेल्या कुटुंबाला घरी चोरी झाल्याची माहिती दिली, त्यानंतर त्यांनी वावी पोलिस ठाण्यातही चोरी झाल्याची माहिती दिली, त्यामध्ये सहा ते सात तोळे सोनं चोरीला गेले आहे.
पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पोलीसांच्या लेखी नोंद करून घेतली आहे. वारंवार अशा घटना सिन्नर परिसरातच घडत असल्याने भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.
समृद्धी महामार्गाचा पैसा मिळाला असल्याने हा परिसरात टार्गेट केला जातोय, कांद्याचे पैसे असल्याने चोरांनी सिन्नर परिसरातच चोरीचा नित्यक्रम सुरू ठेवला असून त्यात चोरटे यशस्वी होत आहे.