आग्रा | 11 नोव्हेंबर 2023 : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील प्रजापती ब्रह्मा कुमारी आश्रमात राहणाऱ्या दोन सख्ख्या स्वत:चं आयुष्य संपवलं. आगरा येथील जगनेर येथे ही घटना घडली. मात्र त्यापूर्वी त्या दोघींनी तीन पानी चिठ्ठीही लिहीली, ज्यामध्ये त्यांनी हे पाऊल उचलण्यासाठी संस्थेतील चार जणांना जबाबदार ठरवलं. एवढेच नव्हे तर त्या आरोपींना आसारामसारखी जन्मठेपेची शिक्षा द्यावी, अशी मागणीही त्या दोन्ही बहिणींनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याकडे केली.
या चिठ्ठीमध्ये मृत बहिणींनी चारही आरोपींवर पैशांचा अपहार केल्याचा तसेच अनैतिक कृत्ये केल्याचा आरोप केला आहे. एसीपी खैरागढ यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारही आरोपी आग्रा बाहेरील आहेत, त्यापैकी दोघांना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोघांना अटक करण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.
8 वर्षांपूर्वी घेतली दीक्षा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता आणि शिखा यांनी 8 वर्षांपूर्वी ब्रह्माकुमारीची दीक्षा घेतली होती. दीक्षा घेतल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी जगनेर येथे ब्रह्मकुमारी केंद्र बांधले होते, ज्यामध्ये त्या दोघीही रहात होत्या. मृत बहिणींपैकी शिखा (32) हिने एक पानी चिठ्ठी तर एकता (३8) हिने दोन पानी चिठ्ठी लिहिली .
आम्ही दोघी बहिणी गेल्या वर्षभरापासून त्रस्त असल्याचे शिखाने तिच्या चिठ्ठीमध्ये नमूद केले. आश्रमातील नीरज सिंघल, धौलपूरचे ताराचंद, नीरजचे वडील आणि ग्वाल्हेरच्या आश्रमात राहणारी एक महिला, आपल्या मृत्यूसाठी जबाबदार असल्याचेही तिने या नोटमध्ये नमूद केले.
धोका दिल्याचेही केले नमूद
‘नीरजने केंद्रात राहण्याचे आश्वासन दिले होते. मात्र केंद्र तयार झाल्यानंतर त्यांनी आमच्याशी बोलणं बंद केलं. आम्ही बहिणी वर्षभर रडत राहिलो, पण त्याने ऐकले नाही. त्याच्या वडिलांशिवाय ग्वाल्हेर आश्रमात राहणारी एक महिला आणि ताराचंद नावाच्या व्यक्तीनेही त्याला साथ दिली. 15 वर्षे एकत्र राहूनही त्याचे ग्वाल्हेर येथील एका महिलेशी संबंध होते. चौघांनी आमचा विश्वासघात केला आहे.’ असे त्या चिठ्ठीमध्ये नमूद करण्यात आले.
‘आमच्या वडिलांनी प्लॉटसाठी आश्रमाशी संबंधित लोकांना 7 लाख रुपये दिले होते. गरीब मातांकडून 18 लाख रुपये घेतले होते, पण ते पैसे आरोपींनी हडप केले. ते फक्त पैसे हडप करत नाहीत तर महिलांसोबत अनैतिक कृत्यही करतात. आमचं कोणीही, काही बिघडवू शकत नाही, असा माज त्यांना आहे. त्यामुळेच ते वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात. त्यांनी अनेक लोकांवर अन्याय केला आहे, असेही त्या बहिणींनी मृत्यूपूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीत नमूद केले. त्यांची ही चिठ्ठी मुन्नी आणि मृत्यूंजय भाई पर्यंत ही चिठ्ठी पोचवावी, असेही त्यामध्ये नमूद करण्यात आले.
अनेक बहिणी जीव देतात, हे लोक ( आरोपी) ते लपवतात. आम्हा दोन्ही बहिणींसोबत गद्दारी झाली. पापी नीरज सिंघल हा माउंट अबू येथील मॉडर्न कंपनीत काम करतो. ग्वाल्हेरची पूनम मोती झील, तिचे वडील ताराचंद आणि जयपूरमध्ये राहणारे तिच्या बहिणीचे सासरे गुड्डन. तो 15 वर्षे आमच्यासोबत राहत होता आणि खोटे बोलत होता. आम्ही कोणतीही चूक केली नाही. आमचे सर्व पैसे केंद्र बांधण्यासाठी खर्च झाले आहेत. आम्हाला नेहमी सांगितले जायचे की तुम्ही काळजी करू नका, मी सर्व गोष्टींची काळजी घेईन. माझे वडील ताराचंद हे वकील आहेत. ते मला काहीही होऊ देणार नाही, असेही त्यांनी म्हटले होते, असे त्या नोटमध्ये लिहीण्यात आले.
आरोपींना कठोर शिक्षा मिळाली पाहिजे
आता आमच्यासबोत कोणीच नाही, आम्ही एकट्या आहोत. त्यामुळेच आम्ही हे पाऊल उचलत आहोत. या चारही आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळाली पाहिजे. सगळे पुरावे आश्रमात आहेत, त्यांना कठोर शिक्षा द्या अशी मागणी दोन्ही बहिणींनी केली.