छत्रपती संभाजी नगरमध्ये दोन गटात गोळीबार; सहा जण जखमी
जमिनीचा वाद टोकाला गेला. मग दोन गटात चांगलीच जुंपली. वाद इतका विकोपाला गेला की पुढे जे घडलं त्याने एकच खळबळ माजली.
छत्रपती संभाजी नगर : सध्या क्षुल्लक कारणातूनही गोळीबार करण्याच्या घटना वाढल्या आहेत. वाढती गुन्हेगारी पाहता गुन्हेगारांना कायद्याचा धाक राहिला नसल्याचे दिसून येत आहे. कल्याणनंतर छत्रपती संभाजी नगरमध्ये गोळीबाराची घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून दोन गटात गोळीबार झाल्याची माहिती मिळते. या गोळीबारात सहा जण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरु आहे. दोन गटात जमिनीवरुन नेमका काय वाद होता. हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस तपास करत असून, प्रकरणाची सविस्तर चौकशी करत आहेत. तपासाअंती वादाचे कारण स्पष्ट होईल.
कल्याणमध्ये दहशत माजवण्यासाठी गोळीबार
कल्याणमध्ये परिसरात आपली दहशत माजवण्यासाठी गोळीबार केल्याची घटना काल मध्यरात्री घडली आहे. आरोपींनी गोळीबार करत परिसरातील गाड्यांची तोडफोडही केली. तसेच एका तरुणालाही मारहाण केल्याचे समोर आलं आहे. दोघेही आरोपी सराईत गुन्हेगार असून, याप्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.