तरुणाची हत्या करुन मृतदेह घरात पुरला, चार वर्षानंतर ‘असा’ झाला खुलासा
गब्रू हा 25 नोव्हेंबर 2018 रोजी बेपत्ता झाला होता. याबाबत पोलिसात मिसिंगची तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर तरुणाचा बराच शोध घेऊनही तरुण सापडला नाही.
मुझफ्फरपूर : उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका तरुणाची हत्या करुन आरोपीने 4 वर्षे मृतदेह आपल्या घरात पुरुन ठेवल्याची घटना घडली आहे. बेपत्ता असलेल्या 25 वर्षीय तरुणाचा सांगाडा गावातीलच एका खोलीत सापडला आहे. मन्सूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारा गावातील ही घटना आहे. गब्रू असे मयत तरुणाचे नाव आहे.
चार वर्षापूर्वी तरुण झाला होता बेपत्ता
गब्रू हा 25 नोव्हेंबर 2018 रोजी बेपत्ता झाला होता. याबाबत पोलिसात मिसिंगची तक्रारही दाखल केली होती. त्यानंतर तरुणाचा बराच शोध घेऊनही तरुण सापडला नाही. गब्रू हा मोलमजुरी करुन कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होता.
4 दिवसापूर्वी आरोपीनेच केला हत्येचा खुलासा
ज्या घरात मृतदेह सापडला आहे, त्या घराचा मालक सलमानने चार दिवसापूर्वी गब्रूचा काका सलीमला गब्रूची हत्या केल्याचे सांगितले. तसेच गब्रूचा मृतदेह घरातील एका खोलीत पुरल्याचेही सांगितले. हे ऐकून सलीमच्या पायाखालची जमीनच सरकली.
घरात खोदकाम केल्यानंतर सांगाडा आढळला
यानंतर शनिवारी सलीमने गावातील काही लोकांना सोबत घेत सलमानच्या घरातील त्या खोलीत खोदकाम केले. खोदकाम केल्यानंतर खड्ड्यातून एक सांगाडा सापडला. यानंतर गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत सांगाडा ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
चौकशीअंतीच हत्येचे कारण उघड होईल
याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, त्याची कसून चौकशी करत आहेत. चौकशीअंतीच आरोपीने ही हत्या का केली याबाबत खुलासा होईल. यानंतर तहरीरच्या आधारे गुन्हा नोंदवून कारवाई केली जाईल, असे सीओ खतौली राकेश कुमार सिंह यांनी सांगितले.