मंदिरातून झाली चप्पल चोरी, म्हणून तरूण चढला पोलिस स्टेशनची पायरी ! म्हणाला, मेहनतीच्या कमाईने …
मंदिरात दर्शनासाठी गेलेला इसम बाहेर आल्यानंतर त्याच्या चपला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याने लगेच पोलिस स्टेशन गाठत FIR दाखल केली. मेहनतीच्या कमाईने विकत घेतलेली चप्पल गेल्यामुळे तो माणूस दु:खी झाला होता.
Crime News : मंदिर असो वा मशीद, किंवा कोणतंही प्रार्थनास्थळ… बऱ्याच वेळा अशा ठिकाणांहून चपला चोरीला (chappal stolen) जाण्याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांना आला असेल. हे तर नेहमीचंच असं समजून लोकं ते सोडून देतात आणि घरी निघून जातात. पण उत्तर प्रदेशातील एका इसमाने त्यांची चप्पल चोरीला गेल्यावर लगेचच एफआयआर (FIR) दाखल केला. पोलीस ठाण्यात दाखल झालेला हा अनोखा गुन्हा सध्या चर्चेचा विषय बनला आहे.
कानपूरच्या दाबौली भागात राहणारे कांतीलाल निगम हे एका इलेक्ट्रॉनिक कंपनीत काम करतात. रविवारी ते शहरातील प्रसिद्ध मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन घेण्यापूर्वी त्यांनी पूजेचे साहित्य विकणाऱ्या दुकानाबाहेर चप्पल काढून ठेवली. मात्र दर्शन घेऊन परत आल्यानंतर दुकानाबाहेरून त्यांची चप्पल चोरीला गेल्याचे त्यांना कळले.
कांतिलाल यांनी प्रथम आजूबाजूला, जवळच्या परिसरात त्यांच्या चपलेचा शोध घेतला. मात्र त्यांना ती कुठेच सापडली नाही. तेव्हा त्यांनी कानपूर पोलिसांच्या ई-पोलीस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल केला.
नव्या चपलांवर कोण ठेवतंय नजर ?
मी दोन दिवसांपूर्वी नवीन चप्पल घेतली होती. त्या निळ्या रंगाच्या चप्पल होत्या, असे कांतीलाल म्हणाले. मी दर रविवारी भैरवबाबांच्या दर्शनासाठी येतो, कारण रविवार हा भैरवबाबांच्या दर्शनाचा दिवस मानला जातो. माझी चप्पल यापूर्वी कधीही गायब झाली नाही. मात्र आज दुकानाभोवती अनेक जुन्या चपला पडून होत्या, पण माझी नवीनच चप्पल गायब झाली. नवीन चप्पलांवर कोणीतरी नजर ठेवतंय, असे दिसत आहे. म्हणूनच मी एफआयआर दाखल केली आहे, असेही कांतीलाल यांनी नमूद केलं.
अनवाणी पावलांनी गेलो घरी
“मी प्रामाणिकपणे आणि मेहनतीने काम करून, त्या पैशांनी चप्पल खरेदी केली होती. मात्र त्याच चपला चोरीला गेल्यामुळे मला अनवाणी घरी जावे लागले. याचा मला खूप त्रास झाला. त्यामुळे माझी चप्पल ज्यानेही चोरली असेल त्याला पकडून कायदेशीर कारवाई करा, ” अशी मागणी त्यांनी एफआयआरमध्ये केली आहे.
चोरी कोणत्याही गोष्टीची असो, ती गोष्ट छोटी असो वा मोठी, चोरी झाल्यास त्याचा गुन्हा नोंदवणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणाची एफआयआर दाखल करणाऱ्या व्यक्तीकडून चप्पल खरेदीचे बिल मागविण्यात आले आहे. त्यानंतर चोरट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासनही पोलिसांनी दिले.