स्नॅपचॅटवर जुळलं, घरच्यांच्या विरोधानंतरही लग्न, नवऱ्याची ‘ती’ गोष्ट कळताच… असं काय झालं असेल?
स्नॅपचॅटवर सुरू झालेल्या मुंबईतील रोझी आणि कोल्हापुरातील तरुण यांच्या प्रेमकथेचे रुपांतर लग्नानंतर फसवणुकीत झाले. पतीचे सत्य समोर येताच रोझीने पोलिसात धाव घेतली.

सोशल मीडियामुळे अनेक घोटाळे, फसवणुकीचे प्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. असेच एक प्रकरण मुंबईतील आहे. व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी एका तरुण आणि तरुणीचे स्नॅपचॅटच्या माध्यमातून प्रेमसंबंध सुरू झाले, मात्र लग्नानंतर काही महिन्यांनी तिला पतीचे सत्य कळाले. त्यानंतर तिने ओशिवरा पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. आता नेमकं काय झालं चला जाणून घेऊया…
नेमकं प्रकरण काय जाणून घ्या
मिळालेल्या माहितीनुसार, जोगेश्वरीच्या बेहरामबाग परिसरात राहणारी २४ वर्षीय तरुणीची १४ फेब्रुवारी २०२४ रोजी स्नॅपचॅटवरून कोल्हापूर येथील २८ वर्षीय तरुणाशी भेट झाली होती. त्याने स्वत:चे बी.कॉम झाले असून 70 हजार रुपये मासिक उत्पन्न असल्याचे सांगितले होते. दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले. पालकांच्या विरोधाला न जुमानता रोझीने १४ एप्रिल २०२४ रोजी कोल्हापूरच्या चंबुखडी संकुलातील गणेश मंदिरात लग्न केले. त्यानंतर ती सासू-सासऱ्यांसोबत कोल्हापुरात राहू लागली.
लग्नाचे पहिले दोन महिने आनंदात गेले, पण नंतर पतीने घरखर्चासाठी पैसे देण्यास नकार दिला. पती व सासूने तरुणीचा मानसिक व शारीरिक छळ करण्यास सुरूवात केली. एवढेच नाही तर सासरच्यांनी तरुणीकडे थेट 5 लाख रुपयांची मागणीही केली. घरातील त्रासाला कंटाळलेल्या तरुणीला वडिलांच्या मोबाईलवरुन कळाले की तिच्या पतीचे आणखी दोन महिलांसोबत संबध आहेत. यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. अखेर 28 जानेवारी 2025 रोजी रोझी सासू सासऱ्यांना सोडून जोगेश्वरी येथील घरी राहू लागली.
तरुणीने केली पोलिसात तक्रार
पतीच्या फसवणुकीला आणि सासू-सासऱ्यांनी केलेल्या विश्वासघाताला कंटाळून मुलीने ओशिवरा पोलिस ठाण्यात पती आणि सासू-सासऱ्यांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.