Tv9 Impact | पोलीस आयुक्तांचा ‘चुन चुन के’ कारवाईचा इशारा, गावगुंडांचा सोलापूर सोडून पोबारा
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे चुन चुन के यादी काढत असल्याची बातमी 'टीव्ही 9 मराठी'च्या वेबसाईटने दिल्यानंतर शहरात वाऱ्यासारखी व्हायरल झाली (Solapur Goons Police Commissioner)
सोलापूर : सोलापूर शहरातून गावगुंडांनी आता आपला गाशा गुंडाळायला सुरुवात केली आहे. सोलापूरचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे (Solapur Police Commissioner Ankush Shinde) यांनी नुकतीच शहरातील गावगुंडांची यादी पोलिसांकडून तयार करुन घेतली होती. पोलीस आयुक्त गुंडांवर मोक्का अंतर्गत कारवाई करणार असल्याचं वृत्त ‘टीव्ही 9 मराठी’च्या वेबसाईटवर प्रसिद्ध होताच गल्लीबोळात दहशत माजवणाऱ्या गावगुंडांची मात्र पाचावर धारण बसली आहे. (Solapur Goons ran away as Police Commissioner Ankush Shinde warns action)
इतना सन्नाटा क्यूं है?
सोलापूर शहर पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्या निर्णयाचं सोलापूरकरांनी स्वागत केलं आहे, तर गावगुंडांनी याचा मोठा धसका घेत शहर सोडायला सुरुवात केली आहे. सोलापूर शहरातील विजापूर वेस परिसरात राहणाऱ्या एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीने आपल्या परिवारासह थेट कर्नाटक गाठल्याचं बोललं जातं. अनेक गुन्हेगारांचं धाबं दणाणलं असून शहरात एकदम ‘सन्नाटा’ पसरल्याचं चित्र आहे.
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी पदभार घेण्याच्या आधी पोलीस आपलं काही करु शकत नाहीत, असा गुंडांचा आविर्भाव होता. किंवा पोलिसांशी संबंध प्रस्थापित करुन काही जणांची गुंडगिरी चालूच होती. मात्र याला पोलीस आयुक्तांनी चाप लावण्याचा निर्णय घेतला. अशा लोकांशी संबंध असणाऱ्या पोलिसांनाही थेट बडतर्फ करुन कारवाईचा बडगा उगारला आहे.
गावगुंडांची पोलीस स्टेशननिहाय यादी
पोलीस आयुक्त अंकुश शिंदे चुन चुन के यादी काढत असल्याची बातमी ‘टीव्ही 9 मराठी’च्या वेबसाईटने दिल्यानंतर शहरात वाऱ्यासारखी व्हायरल झाली. सोलापूर शहरातील गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांची यादी काढण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलीस स्टेशननिहाय यादी पोलीस आयुक्तांकडे लवकरच सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर गुन्हेगारी वृत्तीच्या टोळ्या आणि त्यांच्या म्होरक्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.
गाव आणि गावाच्या नाना तऱ्हा. सोलापूरही त्यात कसं मागे राहणार… इथली चळवळ, कामगार संघटना याशिवाय धार्मिक स्थळासाठी प्रसिद्ध शहर. गुन्हेगारी विश्व ,अवैध धंदे आणि राजकारणाच्या कुरापतीतून होणाऱ्या वादासाठी तितकंच कुप्रसिद्ध. मात्र एखाद्याने मनावर घेतलं तर अशा कुप्रसिद्ध गोष्टींवर आळा तर बसतोच, शिवाय गुन्हेगारी वृत्तीचे लोकही सुतासारखे सरळ होतात आणि आता शहरातही तसंच होतंय.
खासगी सावकारांवरही अंकुश
राज्यात केवळ कागदावर अस्तित्वात असलेल्या कायद्याची अंलबजावणी करत अनेक गरीब लोकांची सावकारी पाशातून मुक्तता केली आहे. सोलापूर शहरात कायद्याची पायमल्ली करत बिनधास्तपणे खासगी सावकार आपले व्यवसाय करत होते. कुणी दहा टक्क्यावर, तर कुणी चाळीस टक्क्यावर गोरगरीब आणि गरजू लोकांना व्याजाने पैसे देत असत. आणि त्यांची एकप्रकारे शहरात वर्षानुवर्षे पिळवणूक सुरुच होती. मात्र यावर कडक कारवाई करण्यास पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी सुरुवात केली आहे. म्हणूनच काही शहरातील 50 हून अधिक खासगी सावकार गजाआड करण्यात आले आहेत ,यात काही नगरसेवक आणि समाजसेवेचा आव आणणाऱ्या खासगी सावकारांचा समावेश आहे. शिवाय गोरगरिबांच्या जागा हडपणाऱ्या लोकांची थेट तुरुंगात रवानगी केली आहे. (Solapur Goons ran away as Police Commissioner Ankush Shinde warns action)
‘लीडर हो तो ऐसा’
गुन्हेगारांवर वचक बसवत असताना आपल्याकडे येणाऱ्या लोकांचे प्रश्न आणि अडचणी तत्परतेने सोडवले जातात. त्यांच्या अडचणी सोडवून त्याचा निपटारा करतात. त्यामुळे पोलीस कर्मचारीही पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांना साथ देतात आणि ‘लीडर हो तो ऐसा’ असं खासगीत बोलतात. मात्र असं असताना सुद्धा नेहमीच प्रसिद्धीपासून दूर असणारे अंकुश शिंदे यांनी आपण वेगळं काही करत नसल्याचं सांगत खाकीशी इमान राखतो असं ते सांगतात.
संबंधित बातम्या :
गल्लीतला दादा ते कुख्यात डॉन, सोलापूर पोलीस आयुक्तांकडून गुंडांची यादी, ‘चुन चुन के’ कारवाई
दुहेरी हत्येतून सुटका, एक्स्प्रेस वेवर मिरवणूक ते पुन्हा अटक, कोण आहे गजा मारणे?
(Solapur Goons ran away as Police Commissioner Ankush Shinde warns action)