अख्ख्या एटीएमवरच मारला डल्ला, नागरिकांनी पाठलाग करत चोरट्यांच्या आवळल्या मुसक्या … कुठे रंगला हा सिनेस्टाईल थरार ?
पैशासाठी हपापलेल्या चोरांची मजल एवढी वाढली आहे की त्यांनी अख्खच्या अख्खं एटीएम मशिनच चोरून आणलं. पण सतर्क नागरिक आणि कर्तव्यनिष्ठ पोलिसांमुळे हा गुन्हा उघडकीस आला.एखाद्या चित्रपटात शोभेल असा पाठलाग सुरू झाला आणि....
सोलापूर | 4 ऑक्टोबर 2023 : गुन्हेगार कितीही हुशार आणि चलाख असला तरी केलेला गुन्हा (crime news) जास्त दिवस लपत नाही. कधी ना कधी उघडकीस येतोच. कानून के हात लंबे होते है असं म्हणतात ते उगीच नाही. एखादी छोटीशी चूक, किंवा पुरावा हा गुन्ह्याच्या उलगडा करण्यासाठी पुरेसा असतो. पोलिसांच्या हाती तो पुरावा लागला की मग गुन्हेगारांची हालत पाहण्यासारखी होते.
मात्र आजकाल राज्यात गुन्ह्यांच्या घटना प्रचंड वाढल्या आहेत. झटपट पैसा मिळवण्याच्या नादात काही जण पातळीच सोडून बसतात. गुन्हा करताना पुढचा – मागचा , काहीच विचार करत नाहीत. राज्यात असाच एक गुन्हा उघडकीस आला आहे. त्यामध्ये चोरट्यांनी चक्क एटीएम (ATM theft) वर डल्ला मारत अख्खच्या अख्ख एटीएम मशीनच चोरी करून (theft case) उचलून आणलं. पण सतर्क नागरिक आणि पोलिसांनी पाठलाग करून एटीएम मशिन चोरणाऱ्या चार आरोपींना पकडून गजाआड केले.
रंगला सिनेस्टाइल थरार
मिळालेल्या माहितीनुसार, या चौघा चोरट्यांनी अहमदनगर जिल्ह्यातील राशन गावातून पिकअप वाहनात टाकून आणलं होतं. एका शेतकऱ्याने माढा पोलिसांना ही माहिती देऊन सतर्कता दाखवल्याने ही घटना उघडकीस आली. त्यानंतर केवज आणि खैराव गावातील नागरिकांनी व पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला. तब्बल तीन तास हा थरार रंगला होता. अखेर त्या चोरट्यांना पकडण्यात यश मिळाले आणि चार आरोपींच्या मुसक्या बांधून त्यांना गजाआड करण्यात आले.
पोलिसांनी चोरांच्या या टोळीकडून चोरी केलेले एटीएम मशीन, ३ लाख ११ हजार रुपयांची रोकड तसेच चोरीसाठी वापरली जाणारी धारदार हत्यारं आणि गॅस कटर इत्यादी माल जप्त केला. तुरूंगात पोलिसांनी कसून चौकशी करताच आरोपींनी गुन्ह्याची कबूली दिली. जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर गुन्हे केलेल्या या आरोपींना पकडल्याबद्दल त्यांनी सतर्क नागरिक आणि पोलिसांचे अभिनंदन केले. या गुन्हेगारांची सखोल चौकशी करण्यात येत असून, आणखी अनेक गुन्हे उघड होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.