मोबाईलवर गेम खेळतो म्हणून घरातल्यांनी हटकलं, रागात आई-वडिलांचा विचार न करता त्याची विहिरीत उडी
बुलडाण्यात अवघ्या 16 वर्षीय मुलाने घरातील सदस्यांनी मोबाईलवर गेम खेळतो म्हणून हटकल्याने रागात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याच्या या निर्णयाने मात्र कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
बुलडाणा : सध्या वातावारण नैराश्यासारखं आहे. बऱ्याच अनपेक्षित अशा घटना आजूबाजूला घडत आहेत. पण या नकारात्मक वातावरणावर मात करुन आपल्याला सकारात्मकतेच्या दिशेला वाटचाल करायची आहे. हीच गोष्ट काहीजण समजून घेण्याच्या प्रयत्नात नाहीत. ते नैराश्यात जावून टोकाचं पाऊल उचलत स्वत:ला संपवून घेताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोठमोठे सेलिब्रिटिंपासून अनेकांनी आत्महत्या करुन स्वत:चं आयुष्य संपवल्याच्या धक्कादायक घटना समोर येत आहेत. बुलडाण्यात तर अवघ्या 16 वर्षीय मुलाने घरातील सदस्यांनी मोबाईलवर गेम खेळतो म्हणून हटकल्याने रागात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्याच्या या निर्णयाने मात्र कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
ऑनलाईन शिक्षणामुळे मुलं गेमच्या आहारी
संबंधित घटना ही बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे घडली आहे. मृतक 16 वर्षीय मुलाचं राहुल राऊत असं नाव आहे. कोरोना संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक सत्र हे ऑनलाईन शिक्षण प्रणालीच्या माध्यमातून सुरु आहे. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या मुलांना ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईल घेऊन दिले. मात्र या शिक्षणासोबतच मुलं ऑनलाईन गेमच्या सुद्धा आहारी जात असल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
नेमकं काय घडलं?
राहुल सतत मोबाईलवर गेम खेळत बसायचा. त्यामुळे त्याच्या पालकांनी मोबाईलमध्ये गेम खेळू नको म्हणून हटकले. त्यानंतर तो रागाच्या भरात घरातून निघून गेला. आपल्या पालकांचा बोलण्याचा त्याला प्रचंड राग आला होता. त्यामुळे आपण घरी येणारच नाही, असं रागात तो म्हणाला होता. त्यानंतर त्याने रागात स्वत:चा जीव देवून आई-वडिलांना आयुष्यभराची शिक्षा देण्याचा विचार केला. राहुलच्या घराशेजारीच एक विहीर आहे. राहुलने मागचापुढचा कोणताही विचार न करता थेट विहिरीत उडी मारली. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा दुर्देवाने विहीरीत बुडून मृत्यू झाला.
राहुलच्या कुटुंबियांची शोधाशोध
बराचवेळ झाला तरी राहुल घरी आला नाही म्हणून कुटुंबियांना काळजी सतावू लागली. त्यांनी शोधाशोध सुरु केली. राहुलचे आई-वडील त्याच्या मित्राच्या घरी त्याला शोधण्यासाठी गेले. तिथे राहूल नव्हता. त्यानंतर गावातील इतर ठिकाणी त्याला शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो रागात शेतात गेला असेल या विचाराने शेतात देखील काहीजण बघायला गेले. पण तिथेही त्याचा पत्ता लागला नाही. या दरम्यान एका जणाला राहुलचा मृतदेह विहिरीत दिसला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
राहुलच्या आई-वडिलांचा आक्रोश, गावकऱ्यांच्याही डोळ्यांत पाणी
संबंधित घटनेची माहिती राहुलच्या कुटुंबियांना देण्यात आली. यावेळी राहुलच्या आई-वडिलांनी टाहो फोडला. आपण उगाच त्याच्यावर ओरडलो, अशी भावना त्यांच्या मनात आली. राहुलच्या कुटुंबियांना आक्रोश करताना बघून गावातील इतर नागरिकांच्या देखील डोळ्यांमध्ये पाणी आलं. या दरम्यान राहुलचा मृतदेह विहिरीत बाहेर काढण्यात आला. पोलिसांनादेखील या घटनेची माहिती देण्यात आली.
मुलाने असं पाऊल उचलायना नको होतं, गावकऱ्यांची प्रतिक्रिया
या घटनेमुळे संपूर्ण गावात शोकाकूळ वातावरण आहे. 16 वर्षीय मुलाने आत्महत्या करुन स्वत:चं आयुष्य संपविल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच मृतक तरुणाच्या भल्यासाठी आई-वडिलांनी त्याला मोबाईल खेळण्यापासून हटकलं तर त्याने आत्महत्या करुन आई-वडिलांनाच आयुष्यभराची शिक्षा दिली. मुलाने असं पाऊस उचलायला नको होतं, अशी प्रतिक्रिया परिसरातील नागरिकांनी दिली आहे.
हेही वाचा :
पैशाच्या आमिषाने देह व्यापारात ओढलं, सात तरुणींची सुटका, दोघांना अटक
प्लीज आई-बाबांना समजव, भावाला ऑडिओ मेसेज पाठवून गर्भवतीची आत्महत्या