लेकीला भेटायला पिता आला, घरीच मुक्काम केला, पण ती ठरली काळरात्र, जावयाने …
एक वृद्ध पिता लेकीला भेटायला सासरी आला. पण तीच त्यांची अखेरची भेट ठरली.

भोपाळ : मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात एका धक्कादायक घटना घडली आहे. येथे जावयाने खाटेवर झोपलेल्या वृद्ध सासऱ्याची हत्या (murder) केली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपी इसमाने त्याच्या पत्नीसमोरच तिच्या वडिलांची हत्या (man killed father in law) केली. यानंतर तो जंगलाकडे धावला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून गुन्हा दाखल करून मृतदेह ताब्यात घेतला. आरोपीचा शोध सुरू आहे.
दमोह जिल्ह्यातील बटियागड पोलीस स्टेशन परिसरातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. केरबना चौकी अंतर्गत जालना गावात काल रात्री एका वृद्धाचा मृत्यू झाला. वृद्धाची हत्या अन्य कोणी नसून त्यांच्याच जावयाने केली आहे. आरोपी जावई गुड्डू आदिवासी याने सासरे रामदास आदिवासी यांच्यावर कुऱ्हाडीने वार केले. त्यामुळे वृद्ध रामदास यांचा जागीच मृत्यू झाला असून आरोपीने घटनास्थळावरून तत्काळ पळ काढला.
यावेळी मृत इसमाची मुलगी यशोदा हीदेखील घटनास्थळी हजर होती, तिने शेजाऱ्यांना घटनेची माहिती दिली. यानंतर माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.
हत्येचे कारण अज्ञात
बटियागड पोलिस स्टेशनच्या प्रभारी सोनाली जैन यांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलिसांनी रामदासचा मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी सामुदायिक आरोग्य केंद्रात पाठवला. आरोपी जावयावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध सुरू आहे. यासोबतच या संपूर्ण प्रकरणाचा तपास करून हत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे.