धक्कादायक ! पॉकेटमनी दिला नाही म्हणून मुलगाच वडिलांच्या जीवावर उठला, ‘ते’ दृश्य पाहून सर्वच हादरले
वडिलांकडे हातखर्चासाठी पैसे मागितले होते, पण त्यांनी देण्यास नकार दिल्याने एक मुलगा पित्याच्याच जीवावर उठल्याचे समोर आले आहे.
Crime News : आई-वडिल हे देवासमान असतात असं म्हणतात. मात्र काही वेळा मुलं आपल्या पालकांचा मान न ठेवता, त्यांच्याशी वाट्टेल तसं वागतात. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मागितलेले पैसे न दिल्याच्या रागातून पुत्रच पित्याच्या जीवावर उठल्याची (son killed father) खळबळजनक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील देपालपुर येथील ही घटना आहे. शेतकऱ्याच्या मुलानेच त्याचे आयुष्य संपवल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलाने पॉकेटमनी म्हणून 2 हजार रुपये मागितले होते, मात्र ते देण्यास नकार दिल्याने आरोपीने वडिलांचे डोके दगडाने ठेचून त्यांची हत्या केली. देपालपूर भागातील शेतात 15 जून रोजी रात्री शेतकरी बाबुलाल चौधरी (50) यांचा मृतदेह मिळाला होता. त्यांच्या हत्येप्रकरणी त्यांचा मुलगा सोहन चौधरी (25) याला अटक करण्यात आली आहे. घटनास्थळावरून मिळालेले पुरावे व परिस्थितीजन्य पुराव्याच्या आधारे चौकशीअंती आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोहनला ड्रग्जचे व्यसन होते. तो त्याच्या वडिलांना शेतीत मदत करायचा. 15 जून रोजी त्याने वडीलांकडे पॉकेटमनीसाठी दोन हजार रुपये दिले, मात्र त्यांनी ही रक्कम देण्यास स्पष्ट नकार दिला. यावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. यामुळे चिडलेल्या सोहनने शेतात पडलेला दगड उचलून वडिलांचे डोके ठेचून खून केला.
शेतात सापडला होता मृतदेह
देपालपूरच्या छोटे कलमेर येथील ५० वर्षीय शेतकरी बाबुलालचे चौधरी हे १५ जून रोजी शेतात जात असल्याचे सांगून घरातून निघून गेले होते. बराच वेळ होऊनही बाबूलाल घरी न परतल्याने नातेवाईकांनी त्याचा शोध सुरू केला. नातेवाईक शेतात पोहोचले तेव्हा बाबूलाल यांचा रक्ताने माखलेला मृतदेह तेथे पडला होता. मृतदेह पाहून कोणीतरी डोके दगडाने ठेचून त्यांचा खून केल्याचे समजले. नातेवाईक घटनास्थळी पोहोचले तेव्हा बाबुलाल यांचा श्वासोच्छ्वास सुरू होता आणि रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाल्याचे काही लोकांचे म्हणणे आहे.
मात्र, पोलिसांकडे कोणीही तसे निवेदन दिले नाही. पोलिसांना घटनास्थळावरून तीन माचिसचे बॉक्स आणि काही कागदपत्रे सापडली. आरोपींनी मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केला असावा, असा संशय व्यक्त केला जात होता. अखेर त्यांच्याच मुलाने शुल्लक रकमेसाठी वडिलांचा खून केल्याचे समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला.