पबजीचा (PUBG MOBILE GAME) नाद फार वाईट. इतका वाईट की तो एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो किंवा मग एखाद्याचा जीव घेण्याचं कारणही ठरु शकतो. पबजीच्या गेममुळे मुलं दिवसागणिक हिंसक होत आहेत, असा एक प्रश्नही उपस्थित केला जातो. दरम्यान, आता तर एका मुलानं पबजी खेळायला आईने नकार दिला, म्हणून तिची गोळ्या घालून हत्या (Son Killed mother) केली. हत्या केल्यानंतर या मुलानं जे केलं ते तर त्याहूनही भीषण होतं. आपल्या आईच्या हत्येनंतर तीन दिवस हा मुलगा तसाच मृतदेहासोबत (Dead Body) राहिला. यावेळी त्याने आपल्या धाकट्या बहिणीला मृतदेहासोबत खोलीत बंद केलं आणि स्वतः ही मृतदेहासोबत खोलीत लपून राहिला. मृतदेह कुजण्याचा वास येऊ लागल्यानंतर शंका आली. शंकेनंतर चौकशी केली गेली. त्यानंतर जे सत्य समोर आलं, त्यानं सगळेच हादरले. आईची गोळ्या घालून हत्या करणाऱ्या या मुलाचं वय आहे, अवघं 16 वर्ष.
ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये घडली. या घटनेनं पोलिसही हादरुन गेले. सडलेल्या मृतदेहाचा दुर्गंध पसरल्यानंतर पोलिसांनी तपास केला. घराच्या बाहेर नाकावर रुमाल ठेवून पोलीस घराबाहेर पोहोचले. तेव्हा संपूर्ण परिसरात मृतदेहाचा दुर्गंध पसरलेला होता. घरात पोहोचल्यानंतर पोलिसांनी कुजलेल्या अवस्थेत बेडवर एक मृतदेह पडलेला असल्याचं पाहिलं. हा मृतदेह इतका सडला होता, की त्याची ओळखच करणं अशक्य झालं होतं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या मुलानं बापाच्या लायसन्स आणि लोडेड गनने गोळ्या झाडून आईची हत्या केली. गोळ्या झाडल्यानंतर हत्येच्या काही क्षणांनंतर या मुलानं बापाला व्हिडीओ कॉलही केला. आपण आईची हत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर बापानं आपल्या नातेवाईकांपैकी एकाला फोन करुन घरी जाण्यास सांगितलं तेव्हा ही थरारक घटना उघडकीस आली.
पोलीस जेव्हा घटनास्थळी पोहोचले, तेव्हा 10 वर्षांची लहान बहीणही त्याच खोलीत होती. भावानं केलेल्या कृत्यामुळे ती एवढी धास्तवली होती की तिचं रडू थांबत नव्हतं. तिच्या तोंडातून शब्दही फुटत नव्हते. या मुलीसमोरच त्यानं आपल्या जन्मदात्या आईवर गोळ्या झाडल्याची शंका पोलिसांना आहे.
शनिवारी आई आणि मुलामध्ये पबजी गेम खेळण्यावरुन वाद झाला होता. आई त्याला सारखी पबजी खेळण्यावरुन रोखायची. पण शनिवारी तर कहरच झाला. रात्री आई साखर झोपेमध्ये असताना दोन वाजता मुलानं कपाटातून बंदूक काढली आणि आईला गोळ्या घातल्या. यानंतर मृतदेहाचा वास येऊ नये यासाठी तो रुममध्ये फ्रेशनरही मारत राहिला होता.